आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य बिघडले : शहरात मलेरियाचे १२, तर चिकुनगुन्याचे ४० रुग्ण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात साथरोगांनी थैमान घातले असून मलेरियाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढली आहे. दुसरीकडे डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली असून चिकुनगुन्याचेही ४० रुग्ण अाढळले आहेत. शहराला आजाराचा विळखा घालणाऱ्या साथींमुळे महापालिकेला हुडहुडी भरली असून गुरुवारी तातडीने बैठक बोलावत महापौर त्र्यंबक तुपे यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला.
शहरात डासांची संख्या वाढण्यामागे व्यवस्थित झालेली नालेसफाई आणि कोणालाही दिसून येणारी धूर फवारणी ही प्रमुख कारणे असल्याचे या बैठकीत समोर आले. मात्र, आयुक्त प्रकाश महाजन यांनी खासगी डॉक्टर रुग्णांचा आकडा फुगवून सांगतात, असा आरोप केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात दोन तास चाललेल्या बैठकीस आयुक्त प्रकाश महाजन, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते जहांगीर खान, एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी, नगरसेवक गजानन बारवाल, कमलाकर जगताप, आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. आमचे घर, परिसर स्वच्छ राखू, अशी शपथ महापौरांसह सर्वांनी घेतली.
आधी ४०० मग २००
बैठकीमध्ये आशा कार्यकर्त्या देशमुख यांनी आम्ही दर दिवशी ४०० घरांमध्ये अॅबेटची मोहीम राबवतो, असा दावा केला. त्यावर विरोधी पक्षनेते जहाँगीर खान यांनी किती मिनिटांत एक घर? मग ४०० घरे कशी होतात, याचा हिशेबच सर्वांपुढे मांडला. मग आरोग्य अधिकाऱ्यांनी सारवासारव करत २०० घरे होत असल्याची कबुली दिली.

महापौर म्हणाले
खासगी डॉक्टर उगाच रुग्णांचा आकडा फुगवून सांगतात. त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्याची संपूर्ण माहिती मनपाला देता मीडियाला आकडेवारी देतात.
उपमहापौर म्हणाले
खासगी डॉक्टर मनपापासून माहिती लपवतात, कारण खासगी डॉक्टरांना मनपाच्या कागदोपत्री कारवाईमध्ये अडकून पडायचे नसते. मात्र, यामुळे अनेक भागांत धूर औषध फवारणी होत नाही आणि रुग्णांची संख्या वाढते.

आयुक्त म्हणाले
शहरातील सर्व शाळांमध्ये प्रार्थनेनंतर पाच मिनिटे साथरोगाला प्रतिबंध कसा घालता येईल आणि त्याचे परिणाम काय आहेत, याविषयी माहिती दिल्यास मोठे प्रबोधन होईल.
म्हणे त्यांना संधिवात
शिवाजीनगरभागामध्ये चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ म्हणाले. त्यावर आरोग्य अधिकारी कुलकर्णी म्हणाल्या की, शिवाजीनगरच्या आणि सी सेक्टरमध्ये आम्ही शिबिर घेतले. ४५ रुग्णांची तपासणी केल्यानंतर असे दिसले की, ४० रुग्णांना संधिवाताचा त्रास होता.
अशा दिल्या सूचना
१.डॉक्टरांनी सुटी घेऊ नका
२. फवारणी आणि अॅबेटनंतर प्रत्येक घरावर करा मार्किंग
३. परिसरातील मोहीम राबवताना नगरसेवकांची स्वाक्षरी घ्या

अति धोकादायक भाग जाहीर
>म्हाडा कॉलनी
>चौधरी कॉलनी
>पुंडलिकनगर
>एन ११
>भावसिंगपुरा
>जवाहर कॉलनी
>कटकट गेट
>बायजीपुरा
>मोंढा नाका
>शहागंज
>मिल कॉर्नर
>शिवाजीनगर
>पहाडसिंगपुरा
>पडेगाव
बातम्या आणखी आहेत...