सिल्लोड - उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी) सर्व प्रमुख पक्षांत बंडाळी दिसून आली. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच पक्षांची धावपळ झाली.
सिल्लोड तालुक्यातून २८ उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले. भाजपने सुरेश बनकर यांना उमेदवारी दिल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुनील मिरकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. उमेदवाराच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादीने शेवटी कॉँग्रेसचे राजू मानकर यांच्या गळ्यात माळ घातली. उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रामदास हिवाळे यांनी उमेदवारी दाखल केली.
वैजापुरातून उमेदवारांची गर्दी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा विजया निकम, भाजपचे एकनाथ जाधव, मनसेचे कल्याण दांगोडे यांच्यासह एकूण १२ जणांनी १९ अर्ज दाखल केले. एकूण २० उमेदवारांचे ३७ अर्ज दाखल झाले आहेत.
पैठणमधून जिल्हा परिषद सदस्य निवडणूक रिंगणात
पैठण । ४६ उमेदवारांनी ६६ अर्ज दाखल केले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षामध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करणा-यांची गाव ना पत अशी अवस्था असताना व ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून न आलेल्या काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काही आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी
आपले अर्ज दाखल केले.
कन्नड मतदारसंघातून २३ उमेदवारांचे ३७ अर्ज
कन्नड | कन्नड-सोयगाव मतदारसंघातून २३ उमेदवारांचे ३७ अर्ज दाखल झाले. अखेरच्या दिवशी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार नामदेवराव पवार यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. भाजपकडून डॉ. संजय गव्हाणे यांनी बी फॉर्म दाखल केला.
गंगापुरातून आंबादास दानवे, बंब यांचे अर्ज
गंगापूर । विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यासह २८ जणांकडून ३८ अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अपक्षांची संख्या मोठी आहे. याशिवाय काँग्रेसच्या शोभाताई खोसरे, राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेनेतर्फे अंबादास दानवे, मनसेतर्फे बादशहा पटेल यांनी बी फॉर्मसह उमेदवारी भरली.