आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन - मोर्चा, निदर्शनांनी गाजला औरंगाबादेत सोमवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इंग्रजी होलिक्रॉस शाळेची मान्यता पूर्ववत करावी, या मागणीसाठी शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 8 मे 2012 रोजी या शाळेची मान्यता काढली आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या विरोधात पालक समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला सकाळी शाळेच्या गेटसमोरून सुरुवात झाली. पालकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मोर्चा बाबा पेट्रोलपंप चौकात येताच वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. त्यानंतर पंचवटी चौक, पदमपुरा, अहिल्याबाई होळकर चौकमार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर नेण्यात आला. पालक एक तास ताटकळत उभे राहिल्यानंतर शिक्षण उपसंचालक पी. बी. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला निमंत्रित केले.
पालकांनी त्यांना निवेदन सादर केले. शाळेने मंजूर तुकड्यांच्या प्रमाणात प्रवेश दिलेले आहेत. मात्र, काही राजकीय पुढार्‍यांच्या दबावामुळे प्रवेश संख्या वाढली. शाळेचे सर्व शिक्षक प्रशिक्षित आहेत. मान्यता रद्द करणार्‍या शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिक्षण उपसंचालकांनी मोर्चेकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर आपण काही निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगितले.
या संदर्भात पालकांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने सादर करून मान्यता पूर्ववत करण्याची माग्णी केली. यावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कोणताच निर्णय न घेतल्यामुळे पालकांनी न्यायालयात धाव घेतली. या वेळी पालक संघाचे प्राध्यापक प्रशांत होर्शिळ, सुनील दाभाडे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. राहत अफरोज, अंजली जाधव, हनुमंत येवले, सरोजा खडके, जयर्शी नेवासेकर, रवी वैद्य, महंमद शफीम, गौतम शेटिया, सुनील डोणगावकर, पिटर पाचवणे, मिलिंद गायकवाड, अशोक पाटील यांच्यासह शेकडो पालक मोर्चात सहभागी झाले होते.
पालक बसले ताटकळत - प्रभारी उपसंचालक चव्हाण न्यायालयीन कामानिमित्त गेल्याने त्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे पालकांना तासभर ताटकळत बसावे लागले. चव्हाण यांचे कार्यालयाच्या परिसरात आगमन होताच मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी त्यांना मागील दाराने कार्यालयात प्रवेश करावा लागला.
पोलिसांकडून अशीही तपासणी - या वेळी क्रांती चौक आणि छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस बंदोबस्तासाठी होते. शिष्टमंडळाची कसून तपासणी घेतल्यानंतर केवळ पाच जणांना आत सोडण्यात आले. कोणीही गोंधळ घालता कामा नये असा दमही मोर्चेकर्‍यांना भरण्यात आला. पत्रकारांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला.