आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे. ती त्यांनी बदललीच पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचा ते जेथे जेथे जातील तेथे पाठलाग करणार आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठा आरक्षणासाठी लढणार्या विविध संघटनांचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले.
बुलडाणा दौर्यावर जाण्यापूर्वी ते शुक्रवारी (26 एप्रिल) औरंगाबादेत काही वेळ थांबले होते. त्या वेळी दै. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी राज यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मनसेचे बरे चालले होते. आमचेही त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी काही म्हणणे नव्हते. मात्र, गेल्या महिन्यात मराठा आरक्षणाविषयी वक्तव्य करून त्यांनी उगाच वाद निर्माण केला आहे. मी जातपात मानत नाही. जातीपातीच्या राजकारणावर माझा विश्वास नाही, एवढे म्हणून त्यांनी थांबायला पाहिजे होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे यापुढील काळात आम्ही जेथे राज ठाकरे जाऊन मेळावे, सभा घेतील तेथे आम्ही त्यांचा पाठलाग करून लोकांना मराठा आरक्षणाविषयी आमचे म्हणणे स्पष्ट करणार आहोत. राज यांनी त्यांची भूमिका बदलली नाही तर त्यांना निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या मागणीसाठी लढत आहोत. तरुणवर्गात अस्वस्थता आहे. त्याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे, असेही मेटे म्हणाले.
अहवालाकडे लक्ष लागले आहे : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य पर्यायच नाही. यासाठी सरकारने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त केली आहे. या समितीचा काय अहवाल येतो, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असेही मेटे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.