आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वणी: मराठ्यांचा इतिहास सांगणाऱ्या ‘मोडी’चा मराठीत सारांश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा आणि पेशव्यांचा नेहमी राजकीय इतिहास सांगितला जातो, मात्र त्यांच्या सामाजिक इतिहास सांगणाऱ्या ‘मोडी’ लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवजांचा खजिना इतिहासप्रेमींसाठी खुला करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास प्राचीन भारतीय संस्कृती विभागातील इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त हा दुर्मिळ ठेवा बाहेर काढला आहे.

वस्तुसंग्रहालयामध्ये सरदार घराणे, साताऱ्याचे मराठा आणि पेशवेकालीन मोडी लिपीतील दस्तऐवजांचा अनमोल ठेवा आहे. सुमारे २५ ते २६ हजार मोडी पत्र लोकांना अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे यांनी मागील दोन वर्षांपासून वस्तुसंग्रहालयाचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यंदा इतिहासप्रेमींना ‘मोडी’ वाचता यावी, म्हणून मराठीमध्ये त्याचा सारांश दिला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यापीठ परिसराच्या बाहेरील विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. स्त्रियांची गुलामगिरी, जातीय व्यवस्थेवर अाधारित काही महत्त्वाचे दस्तऐवज प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. त्याशिवाय मेणवली दफ्तर, पटवर्धन दफ्तर, निझाम-मराठे, नागपूरकर भोसले, करवीर संस्थानाची कागदपत्रे, सातारा दफ्तर, अहिल्याबाई होळकर, पेशवे दफ्तर इंग्रजांची काही कागदपत्रे, इंग्रजांच्या हालचालीचा उल्लेख करणारे पत्र, मुली विकण्यासाठी केला जाणारा व्यवहार, तुरुंगातील लोकांना सोडावे म्हणून लिहिलेले मोडी लिपीतील पत्र वाचण्यासाठी लोकांची पसंती आहे.

खुल्या दालनाचेही होईल उद्घाटन
१८जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता पुणे येथील डेक्कन कॉलेजचे कुलपती प्रा. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते ऐतिहासिक दस्तऐवजांच्या ‘शिल्पा’साठी उभारलेल्या खुल्या दालनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
त्याशिवाय ‘आपले अस्तित्व : शिल्प’ आणि ‘आपले अस्तित्व : चित्रसौंदर्य’ या दोन विषयांवर प्रा. देगलूरकर यांचे व्याख्याने होतील. १८ आणि १९ जानेवारीला दुपारी चार वाजता हे व्याख्यान होईल.

दुर्मिळ दस्तऐवज सर्वांनी पाहावे
इतिहास प्रेमींनीच काय,सर्वसामान्यांनी देखील हा दस्तऐवज पाहण्याची गरज आहे. ‘मोडी’ लिपीतील सारांश कळावा म्हणून आपण देवनागरी लिपीत रकाने दिले आहेत. त्यातून आपल्याला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे चित्र कळण्यास मदत होऊ शकते. -डॉ. उमेश बगाडे, विभागप्रमुख,इतिहास.