मुंबई- मराठा समाजाला अारक्षण, काेपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अादी मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी मुंबईसह राज्यभर चक्का जाम अांदाेलन करण्यात अाले. अाैरंगाबाद व सिंधुदुर्गचा अपवाद वगळता सर्वत्र हे अांदाेलन शांततेत पार पडले. मुंबईत येणारे सर्व मार्ग अांदाेलकांनी रोखल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या. सिंधुदुर्गात मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. काही भागांत रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून वाहतूक रोखण्यात आली. शहरात एकूण २५ ठिकाणी चक्का जाम करण्यात आला. हिंसक अांदाेलकांना पांगवण्यासाठी काही ठिकाणी पाेलिसांना लाठीमारही करावा लागला.
हेही वाचा...आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर, वाहनचालकांनी काढली नदीतून वाट!मुंबई आणि ठाणे या दोन शहरांतील वाहतूक सकाळी दोन तास बंद होती. ठाण्यातील आनंदनगर चेक नाक्यावर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शंभरपेक्षा अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून िदले. दादरमध्ये हिंदमाता, चित्रा टॉकीजजवळ आंदोलक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. या परिसरातील शिवाजी मंदिर, प्लाझा सिनेमा येथेही रस्ते रोखण्यात आले होते. नवी मुंबईत कामोठेजवळही मराठा संघटनांनी रस्ता अडवला होता. त्यामुळे सायन ते पनवेल या महार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. मुंबई ते पुणे एक्स्प्रेस महामार्गाला आंदोलनाचा फटका बसला. वरळी नाका, चेंबूर येथील शिवाजी पुतळा, डोंबिवली, मुलुंड, जेजे फ्लायओव्हर येथेही आंदोलन झाले. हाती भगवे झेंडे अाणि काळे टी-शर्ट परिधान केलेले कार्यकर्ते घाेषणा देत रस्त्यावर बसलेले िदसत हाेतेे. त्यामध्ये महिला आणि युवतींची संख्याही बरीच िदसत होती. सकाळी ११ नंतर आंदोलनाचा जोर ओसरला हाेता.
शहिदांच्या सन्मानार्थ अांदाेलन स्थगित...
अकाेला- जम्मू-काश्मिरातील िहमस्खलनात वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद अानंद गवई व संजय खंडारे यांचे पार्थिव अकाेला िजल्ह्यात येणार असल्याने सकल मराठा समाजाचे अांदाेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात अाला. देश व देशासाठी प्राणाची अाहुती देणाऱ्या जवानांपुढे सर्व गाैण असल्याचा संदेश यानिमित्ताने. संपूर्ण समाज शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून, या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी अािण कार्यकर्त्यांनी कुठेही अांदाेलन करू नये, असे अावाहनही समाजातर्फे करण्यात अाले.
नाशिक-पुण्यातही चक्का जाम
नाशिक शहर व जिल्ह्यात मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे विविध ठिकाणी चक्का जाम अांदाेलन करण्यात अाले. महानगराच्या सीमेवरील महामार्गावर झालेल्या या अांदाेलनांमुळे मुंबई - अाग्रा महामार्ग अाणि नाशिक - पुणे महामार्ग हा काही काळ ठप्प झाला हाेता. मात्र, पाेलिसांनी अांदाेलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. जिल्ह्यात निफाड, लासलगाव, येवला, सिन्नर, दिंडाेरी, मालेगाव, कळवण, सटाणा, मनमाड, अाेझर, चांदवड, देवळा अादी ठिकाणी ही अांदाेलने झाली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन त्वरित मागण्यांचा विचार करून न्याय द्यावा, अन्यथा अजून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. अांदाेलनामुळे बराच काळ वाहतूक ठप्प झाली हाेती. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘चक्का जाम’ अांदाेलन करण्यात अाले. बहुतांश ठिकाणी शांततापूर्ण झालेल्या या अांदाेलनात मराठा समाजाचे सर्वपक्षीय नेते तसेच राजकीय पदाधिकारी एकत्र दिसून अाले. अांदाेलनकर्त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात अटक करून नंतर साेडून देण्यात अाले.
पुणे शहर व िजल्ह्यात शांततेत अांदाेलन पार पडले. पिंपरीतील अांबेडकर चाैक, चिंचवडमधील थरमॅक्स चाैक, निगडीतील भक्ती-शक्ती चाैक, भाेसरी येथील पांजरपाेळ, पर्णकुटी येरवडा, भूमकर चाैक वाकड, मॅगझीन चाैक पुणे, शेवाळवाडी फाटा हडपसर, खेड शिवापूर टाेल नाका, तळेगाव-वडगाव फाटा, कार्ला फाटा अादी ठिकाणी रास्ता राेकाे करण्यात अाला. रुग्णवाहिका व तातडीच्या सेवांची अडवणूक न करण्याची भूमिका अायाेजकांनी सुरुवातीलाच जाहीर केली हाेती.
नागपुरात अल्प प्रतिसाद
उपराजधानी नागपुरात मराठा समाजाच्या वतीने करण्यात अालेल्या चक्का जाम अांदाेलनाला अल्प प्रतिसाद मिळाला. गणेशपेठ येथील बसस्थानक चौकात सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार होते. मात्र सकाळी ११.१५ वाजता सुरू झालेले हे आंदोलन कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने ११.२७ वाजताच गुंडाळावे लागले. नागपुरात यापूर्वी दोन वेळा निघालेल्या मराठा क्रांती मोर्चालाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
‘सकल मराठा’ चक्का जामला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
औरंगाबाद- सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवर वाहतूक ठप्प होती. किरकोळ प्रकार वगळता अांदोलन नेहमीप्रमाणे शांततेत पार पडले. जालन्यात वीस, तर लातूर शहर आणि जिल्ह्यात किमान ४० ठिकाणी आंदोलन करण्यात आले. परभणी, हिंगोली, उस्मानाबादसह बीडमध्येही आंदोलन पार पडले. औरंगाबाद-सोलापूर, औरंगाबाद-नगर, औरंगाबाद-जळगाव आणि औरंगाबाद-धुळे या महामार्गावर ठिकठिकाणी ठरलेल्या वेळी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. लातूर आणि परभणीत आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली.
दोन ठिकाणी दगडफेक
औरंगाबाद व वाळूज येथे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. त्यात पोलिस निरीक्षकासह ४० जण किरकोळ जखमी झाले. आयोजकांनी नऊ वर्दळीच्या चौकात वाहने अडवली जातील, असे सोमवारीच जाहीर केले होते.
बीड- आंदोलन शांततेत, जिल्ह्यातील वाहतूक विस्कळीत
सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत परळी, पाटोदा, माजलगाव वडवणी येथे वाहतूक विस्कळीत झाली होती. केजमध्ये पोलिसांनी आंदोलकांना काही वेळ अटक करून नंतर जामिनावर सोडून दिले. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकाळी साडेदहा वाजता चक्काजाम आंदोलन केले. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे चक्काजाम आंदोलनामुळे बीडहून परळीकडे येणारी-जाणारी, गंगाखेडहून परळीकडे जाणारी वाहतूक दोन तास खोळंबली होती, तर केज येथे आंदोलन मागे घेतले जात नसल्याचे पाहून पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी काही आंदोलनकर्त्यांना अटक करून पाेलिस ठाण्यात नेले. त्यानंतर सोडून दिले.
जालना- वीस ठिकाणी समाजबांधव रस्त्यावर
आंदोलनास जिल्ह्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २० ठिकाणी झालेल्या चक्का जाम आंदोलनात नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्तीची आचारसंहिता पाळत सहभागी होऊन आंदोलनातून भावना व्यक्त केल्या.
प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांची निवेदने देऊनही शासनाकडून कुठलेच पाऊल उचलले जात नसल्यामुळे ३१ जानेवारी रोजी राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यात जालना शहरासह बदनापूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी, जाफराबाद या तालुक्यांसह कुंभार पिंपळगाव, शहागड, रामनगर कारखाना, वाटूर, राजूर आदी ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. या आंदोलनामुळे जालना शहरात येणारी वाहतूक दोन तास खोळंबली होती. या आंदोलनामुळे चक्का जाम करण्यात आलेल्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. आंदोलनास हिंसक वळण लागू नये म्हणून आयोजकांनी अगोदरच सर्वांना सूचना केल्या होत्या. याशिवाय आंदोलनामुळे वाहनचालक, प्रवाशांना कुठलाच त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
लातूर- शहराकडे येणारी वाहतूक रोखली
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी लातूर जिल्ह्यात आयोजित केलेले चक्काजाम आंदोलन शांततेत पार पडले. शहराकडे येणारी वाहतूक रोखण्यात आल्यामुळे खासगी तसेच सार्वजनिक वाहने रस्त्यांवरच अडकून पडली होती. दुपारनंतर आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
लातूर शहर आणि जिल्ह्यात किमान ४० ठिकाणी आंदोलन झाले. लातूर शहरात येणाऱ्या छत्रपती चौक, पीव्हीआर चौक, नवीन रेणापूर नाका, बाभळगाव नाका, नांदेड नाका या प्रमुख चौकांमध्ये वाहतूक रोखण्यात आली. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांबरोबरच पर्यायी लहान रस्त्यांवरही वाहने आडवी लावण्यात आली होती. कर्नाटकातून येऊ घातलेली वाहतूक देवणी, वलांडी, औराद शहाजानी, उदगीर सीमेवर रोखण्यात आली होती. ग्रामीण भागातही या आंदोलनाचा परिणाम जाणवला. अहमदपूरमध्ये भजने गात वाहने रोखून धरण्यात आली होती. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरल्यानंतरही या आंदोलनाला गालबोट लागले नाही. बहुतांश शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.
उस्मानाबाद- संघटना, पक्षांचा जाहीर पाठिंबा
परंडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी (दि.३१) हजारोंच्या उपस्थितीत दोन तास चक्काजाम करण्यात आले. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनास महाराष्ट्र राज्य मुजावर जमात संघटना, रिपाइं, अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मंडळ, शहीद टिपू सुलतान सामाजिक युवा मंच, विधिज्ञ मंडळ, राष्ट्रीय समाज पक्ष आदींनी पाठिंबा दिला. तरुणाईचा मोठा सहभाग होता. श्री शिवाजी कॉलेजच्या प्राचार्या आशा मोरजकर यांनी सूत्रसंचालन, गीतांजली मांजरे, रोहिनी जाधव, सुलोचना फराटे, सत्यशीला महाडिक, अनुजा वारे, सिमरन जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. बस आगाराच्या वतीने दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. वाशी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २११ वरील तेरखेडा, सरमकुंडी फाटा, पारगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी चक्काजाम करण्यात आला. तामलवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.३१) सोलापूर-तुळजापूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आले. तामलवाडीसह पिंपळा बु., देवकुरळी, होनसळ, गंजेवाडी, वडगाव, गंगेवाडी येथील समाजबांधवांचा सहभाग होता.
परभणी- सकाळी दहा वाजेपासून समाजबांधव उतरले रस्त्यावर
परभणी शहरातील तीन प्रमुख मार्गांसह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागातही राज्य रस्त्यांवर मराठा समाजाने रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठा कालावधी लागला.
गंगाखेड, वसमत रस्ता, जिंतूर रोड या तिन्ही प्रमुख मार्गांवर मराठा समाजाच्या हजारो नागरिकांनी सकाळी दहा वाजेपासून रस्त्यावर ठाण मांडले. वसमत रस्त्यावर झालेल्या आंदोलनात कृषी विद्यापीठाच्या कमानीजवळ आंदोलनादरम्यान जाहीर सभेत मराठा समाजाच्या एका युवतीने मागण्या मांडल्या. समाजातील सर्वच घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग नोंदवला.
सेलूत रायगड काॅर्नर येथे तीन तास अांदोलन केलेे. या अांदोलनात आ. विजय भांबळे, डाॅ. संजय रोडगे, छगन शेरे, वसंत बोराडे सहभागी झाले.
टायर जाळले : गंगाखेड रस्त्यावर काही युवकांनी टायर जाळून शासनाचा निषेध नोंदवला. एस. टी. महामंडळाने काही काळ वाहतूक बंद केली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
हिंगोली- सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग, 25 ठिकाणी मराठा समाजाचे आंदोलन
जिल्ह्यात सुमारे २५ ठिकाणी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. नांदेड व अकोला बायपास, अग्रसेन चौक नर्सी फाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सेनगाव येथे जिंतूर फाटा, रिसोड रस्ता या ठिकाणी, वसमत येथे परभणी व जिंतूर रस्ता, कळमनुरीत हिंगोली व नांदेड रस्त्यावर तर औंढा नागनाथ येथे हिंगोली, परभणी, जिंतूर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार तानाजी मुटकुळे, खासदार राजीव सातव, आमदार रामराव वडकुते, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह मराठा समाजातीलही सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते.
घोषणाबाजी नाही : शहरांशिवाय जिल्ह्यात १५ ठिकाणी असे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी कुठेही घोषणाबाजी केली नाही. यामुळे आंदोलन शांततेत पार पडले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, राज्यभरातील चक्काजाम आंदोलनाचे फोटोज आणि व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)