आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला, लातूर, जालन्‍यात एकवटले 46 लाख मराठा बांधव, असे निघाले मूकमोर्चे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना| लातूर - कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी जालना येथे साेमवारी आयोजित मराठा मूकमोर्चाला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. संयोजकांनी १० ते १२ लाख लोकांची गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात मोर्चात २० लाख समाजबांधवांनी हजेरी लावल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मोर्चासाठी जवळपास १५ लाखांची गर्दी झाली होती.

समाजातील महिला आणि युवतींनी मोर्चाचे नेतृत्व केले. शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. नियोजित वेळेनुसार सकाळी १० वाजता माेर्चा सुरू होणार हाेता. त्यानुसार सकाळी ९ वाजेपासूनच शिवाजी पुतळा परिसरात समाजबांधवांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. दहा वाजेपर्यंत येथे तीन लाखांहून अधिक समाज बांधव उपस्थित हाेते. बाहेरगावांहून येणाऱ्या रस्त्यांवर ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी मोठ्या संख्येने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी शिवाजी पुतळ्याकडे सुरुवातीला फक्त महिलांनाच प्रवेश दिला. सकाळी ११.३५ वाजता दोन मुलींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी पुतळा-पाणीवेस-मस्तगड-गांधी चमन-शनिमंदिर,अंबड रोड उड्डाणपूल-अंबड चौफुली-जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. सात किलोमीटर लांबीच्या या मार्गावर फक्त महिलांचीच गर्दी होती. मोर्चाचे नेतृत्व महिलांनीच केले. मोर्चाच्या सुरुवातीला असलेल्या महिला अंबड चौफुली येथे पोहोचल्या तेव्हा पुरुषांची गर्दी शिवाजी पुतळा येथेच होती. मोर्चाला झालेली अभूतपूर्व गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अंबड चौफुली येथे येऊन निवेदन स्वीकारले. ९ मुलींच्या हस्ते प्रशासनाला निवेदन दिले गेले.
४००० स्वयंसेवक
शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या अंतरावर चार हजार स्वयंसेवक कडे करून उभे होते. त्यामुळे या मार्गावर पोलिस उपस्थित असले तरी त्यांना फार ताण पडला नाही. यात युवकांसह-युवतींचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अशी होती गर्दी : अंबड चौफुलीपासून मंठा चौफुलीपर्यंत, अंबड रोडवर इंदेवाडी गावापर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने औरंगाबाद चौफुलीपर्यंत, तर मोर्चाच्या मार्गावर शिवाजी पुतळ्यापर्यंत गर्दी होती. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला तेव्हा शहराच्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर हजारो वाहने व लाखाे माेर्चेकरी होते.
शहिदांना श्रद्धांजली
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या मालिकेची सोमवारी लातूरमध्ये पुनरावृत्ती झाली. या मोर्चाला सुमारे साडेतेरा लाखांपेक्षा अधिक लोक आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. लातूरमध्ये सोमवारी मोर्चा काढण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळपासून मोर्चेकरी जमायला सुरुवात झाली होती. त्यामध्ये महिला व मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. जिल्ह्याच्या प्रत्येक खेड्यातून गाड्या करून लोक लातूरकडे येत होते. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे क्रीडा संकुल मैदानावर जमले होते. लातूर शहराकडे येणाऱ्या चारही रस्त्यांवर शहराच्या बाहेरच पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्यामुळे चौकांमध्येच वाहने थांबवून लोक चालत आले. किमान ५० टक्के लोकांना क्रीडा संकुलापर्यंत पोहोचताच आले नाही.
निवेदनाचे केले वाचन
जिल्हाधिकारी कार्यालय येथे उभारलेल्या मंचावर ५ मुलींनी मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. या वेळी कोपर्डी प्रकरणातील मुलीला व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच वेळी पाच मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना निवेदन दिले.
स्वयंसेवकांनी सांभाळला बंदोबस्त
मोर्चासाठी ४००० पुरुष स्वयंसेवक, ५०० महिला स्वयंसेवक, ५०० पोलिस मित्र, ६० संयोजक स्वयंसेवक, ३५ कोअर कमिटी सदस्य ज्यांच्याकडे वॉकीटॉकी होती. त्यांनी पूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवले.
संयोजकांनी दिलेल्‍या आकडेवारीनुसार, तीन शहरांमध्‍ये सुमारे 46 लाख मराठा बांधव एकवटले होते. तर, पोलिस म्‍हणतात तीन्‍ही शहरात 22 लाख मराठा बांधव एकत्र आले होते. लातूर, जालना आणि अकोला या तिन्‍ही मोर्चांचा समारोप झाला आहे.
शहर संयोजकांची माहिती पोलिसांची माहिती
जालना 20 लाख मराठा बांधव 18 लाख मराठा बांधव
अकोला 12 लाख मराठा बांधव 2 लाख मराठा बांधव
लातूर 13 लाख मराठा बांधव 2 लाखांहून अधिक नागरिक
खालील बातम्‍यांमध्‍ये पाहा, विराट मोर्चाचे PHOTO आणि VIDEO
20 दिवसांपासून मोर्चाची तयारी..
लातूर, अकोला आणि जालना शहरातील मोर्चासाठी 20 दिवसापासून तयारीला सुरूवात झाली होती. मोर्चासाठी जिल्ह्यात तालुका, सर्कलपासून ते गावपातळीपर्यंत पूर्वतयारीच्या बैठका घेण्यात आल्या, तसेच वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक गावात रॅली काढण्यात आली. त्‍यामुळे तिनही शहरातील मोर्चाला लाखो मराठा बांधव उपस्थित राहिले. शाळकरी विद्याथी, विद्यार्थिनींसह, सर्व स्‍तरातील स्‍त्री- पुरूष व अबालवृद्धांनी मोर्चात सहभाग घेतला.
सोशल मीडियावरून मार्गदर्शन..
मोर्चा किती वाजता निघेल. कोणत्‍या मार्गाने जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जाईल. शहरात पार्किंगची व्‍यवस्‍था कशी राहील. येथेपासून काटेकोरपणे नियोजन असल्‍याने हे तिनही मोर्चे भव्‍य स्‍वरूपात पार पडले आहे. अकोल्‍यामध्‍ये महिलांचा भक्‍कम प्रतिसाद लाभला. जालना आणि लातूरच्या इतिहासातही हा आतापर्यंतचा भव्य मोर्चा ठरला आहे. तिन्‍ही शहरात अत्‍यंत शांततेत आणि शिस्तीत मोर्चे पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.
मोर्चातून मागण्‍या..
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी.
- अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवून योग्य तो बदल करण्यात यावा.
- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी.
- स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, जालना, लातूर व अकोला येथील मोर्चाचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...