आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाच्या प्रश्नांचे काय झाले याचे उत्तर द्यावे- क्रांती मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सकल मराठा समाजाने विविध प्रश्नांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली क्रांती चौकातून आंदोलनास सुरुवात केली होती. आजही सर्व प्रश्न कायम आहेत. मुख्यमंत्री राज्यपाल शनिवारी शहरात येत आहेत. जेथून आंदोलनास सुरुवात झाली होती त्या क्रांती चौकात येत असल्याने त्यांना मराठा समाजाचा प्रश्नांचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समाज बांधव एकत्रित येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजबांधवांशी चर्चा करावी, अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून केली.
 
कोपर्डी दुर्घटनेतील आरोपींना तातडीने फाशी द्यावी. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता ५० टक्के नफा या तत्त्वावर हमी भाव मिळावा, अॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक करावा, पण त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात तेवढ्याच क्षमतेने कारवाई व्हावी. आरक्षण लागू होईस्तोवर केजी टू पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज ऑगस्ट २०१६ क्रांतिदिनापासून क्रांती चौकातून शांततेत मोर्चा, आंदोलन करत आहे. मुंबई येथील महामोर्चात मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे जाहीर केले होते. मात्र, आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे जेथून क्रांती मोर्चास मराठा समाजाने सुरुवात केली तेथेच सरकार येणार असल्याने आम्ही सकल मराठा समाजाचे प्रश्न विचारण्यासाठी क्रांती चौकात उपस्थित राहणार आहोत.
 
मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून घ्यावा पुढाकार
मुख्यमंत्र्यांनी स्वत: भेटून मराठा प्रश्नांचे काय झाले ते सांगावे. त्यात समाजाचे प्रश्न सध्या कोणत्या टप्प्यावर आहेत? आपण तीन वर्षांत मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले? पुढचे नियोजन काय आहे? कधीपर्यंत प्रश्न सोडवणार? या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सकल मराठा समाजाशी खुली चर्चा करावी अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर द्यावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केली.
 
बातम्या आणखी आहेत...