आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चाचे सत्याग्रह आंदोलन, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा केला निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यभर विक्रमी मोर्चे काढूनही राज्य शासनाकडून मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याचा निषेध करण्याबरोबरच शासनाने लक्ष वेधण्यासाठी ऐन दिवाळीत गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. 
 
मराठा समाजाचे विविध प्रश्न, समस्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी समाजाच्या वतीने विक्रमी ५८ मोर्चे अतिशय शांततेत काढण्यात आले. समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने मुंबई मोर्चाच्या वेळी देण्यात आली होती. त्यास दोन महिने उलटले तरी सरकारकडून कोणतीही कृती करण्यात आली नाही. सरकारच्या थापांमुळे मराठा तरुण युवक संतप्त झाला आहे. मराठा आरक्षणासाठी काय केले? स्वामिनाथन आयोग, अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग थांबलेला नाही. शेतकरी कर्जमाफी कुणाला मिळाली? कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत निकाल लावण्याची ग्वाही दिली होती. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पंतप्रधानांनी थाटामाटात उद््घाटन केले. त्याचे पुढे काहीच नाही. 

झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी क्रांती मोर्चा नव्याने सुरुवात करत आहे. त्याचा पहिला भाग म्हणून हे सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. यानंतर २९ ऑक्टोबरला सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात मराठा महासभा घेण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यात आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली जाईल. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक रवींद्र काळे, रमेश केरे, प्रा. माणिकराव शिंदे, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अशोक वाघ, सतीश वेताळ, प्रशांत इंगळे, परमेश्वर नलावडे, योगेश केवारे, भरत कदम, गणेश वडकर, तुषार शिंदे, नीलेश ढवळे आदी उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...