आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर भुजबळांनी जाहीर केला मराठा आरक्षणाला पाठिंबा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात शनिवारी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ यांच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला. या गोंधळातच शेवटी पाटील यांना भाषण आटोपते घ्यावे लागले आणि भुजबळांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. आरक्षणासाठी आग्रही असलेल्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून पाटील-भुजबळ यांना पोलिस बंदोबस्तात विमानतळाकडे रवाना करण्यात आले.

देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मेळाव्यासाठी मराठवाड्यातून मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. जमावातून अचानक आरक्षणासाठी घोषणाबाजी सुरू झाल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी पाटील यांचे भाषण थांबवल्यानंतर भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ‘मराठा आरक्षणाला आमचाही पाठिंबा आहे. पवारांना तुमची चिंता आहे..’, असे समजावत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग दुसर्‍या दौर्‍यात औरंगाबादकडे पाठ फिरवली. 27 ऑगस्टला राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य ग्रामस्वच्छता अभियानाच्या पुरस्कार वितरण समारंभाला ते आले नव्हते. शनिवारी पक्षाच्या विभागीय मेळाव्यालाकडेही त्यांनी पाठ फिरवली. विमान उपलब्ध न झाल्याने ते या मेळाव्याला येऊ शकले नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला.

व्हॅलेंटाइनच्या विरोधाला मोडीत काढू
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी होणार्‍या विरोधाला मोडीत काढून वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा व्हॅलेंटाइन विरोधकांना देतानाच विद्यार्थ्यांसाठी ‘यू आर माय व्हॅलेंटाइन’ असल्याचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. दरम्यान, नगरसेवकांवर गद्दारीचे आरोप करत असंसदीय शब्द वापरणारे कदीर मौलाना मेळाव्यात व्यासपीठावर वावरताना दिसले. त्याला कोणीही आक्षेप घेतला नाही. तसेच मधुकरराव मुळे हेसुद्धा मेळाव्याला उपस्थित होते.


भुजबळ म्हणाले, राणे देतील आरक्षण!
0 मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. नारायण राणे कमिटीकडे हे प्रकरण आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आरक्षण मिळेल. (पुन्हा घोषणा)
0 अरे, तुम्ही चार पोर्‍हं काय घोषणा देताय. राणे तिकडे बसलेत. ते देतील तुम्हाला आरक्षण. कोणत्याही पक्षातून यायचं अन् आरक्षण मागायचं. केंद्रात शरद पवार बसलेत. त्यांना सर्वांची चिंता आहे. सर्व काही नीट होईल. (घोषणाबाजी सुरूच)
0 पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना आवरले. गोंधळामुळे भुजबळांनीही भाषण आटोपते घेतले. घेरावची शक्यता पाहून पोलिसांनी दोन्ही नेत्यांना तातडीने मेळाव्याच्या ठिकाणाहून बाहेर काढले.

कार्यकर्ते हजर, मेटे गैरहजर!
अचानक सुरू झालेल्या घोषणाबाजीमागे राष्ट्रवादीचेच आमदार विनायक मेटे असल्याची चर्चा आवारात सुरू होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष जाधव यांना छेडले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. आरक्षणाबाबत पक्षाने पूर्वीच धोरण स्पष्ट केले असल्याचे सांगून त्यांनी विषय टाळला. विशेष म्हणजे मेळाव्याला मेटे अनुपस्थित होते.