आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Amol Kolhe Visit To Dainik Divyamarathi

आताची तरुणाई निर्भीड, हक्कांसाठी आक्रमक- अमोल कोल्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अमोल कोल्हेंची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि मूळ औरंगाबादकर असलेले शौनक शिरोळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘रणभूमी’ चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी ते शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. कोल्हे म्हणाले की, आपल्याला नेमके काय हवे आहे, हे अगदी छोट्या शहरातील तरुणाईला पक्के ठाऊक झाले आहे. राजकारण्यांचा भ्रष्टाचार, यंत्रणेचा गैरवापर थांबला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. गेल्या पिढीत एवढा ठामपणा नव्हता.

‘रणभूमी’चा विषय महाविद्यालयातील निवडणूक आणि राजकारण असा असल्याने तो तरुणाईला आकर्षित करणारा आहे. ‘शंभुराजे’ नाटकाला सवरेत्तम प्रतिसाद कोणत्या शहरात मिळाला? याचे उत्तर देताना त्यांनी पटकन ‘औरंगाबाद’ असे सांगितले. ऐतिहासिक भूमिका साकारताना अनेक पैलू अनुभवावे लागतात. फक्त व्यक्तिरेखेचा अभिनय साकारून चालत नाही, तर त्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करून त्याची मानसिकता अनुभवावी लागते. शिवाजी आणि संभाजी या भूमिका साकारताना मी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आणि आपोआप देहबोली, संवादशैली माझ्यात उतरत गेली. मी ऐतिहासिक भूमिका साकारल्या असल्या तरीही माझ्या निराळ्या छटांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात ठसल्या. ‘अधुरी एक कहाणी’ मधला ‘दिवाकर’ अनेकांना भावला. ‘गोजिरवाण्या घरात’मधली माझी खलनायकाची भूमिकाही प्रेक्षकांना भावली. नाटक जिवंत अभिनय करायला लावते, मालिका थेट प्रेक्षकांच्या घरात नेऊन ठेवते, तर सिनेमा हृदयात चिरकाल जागा बनवतो, असेही ते म्हणाले.

अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या भावना
मागील पिढीच्या तुलनेत आताची तरुणाई वैचारिकदृष्ट्या निर्भीड आणि स्वत:च्या हक्कांविषयी आक्रमक असल्याचे मत प्रख्यात अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. केवळ तरुणच नव्हे, तर तरुणीही त्यांचे विचार अधिक अचूक आणि ठामपणे मांडत असल्याचा अनुभव मला राज्यभरातील विविध शहरांत फिरल्यावर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वडिलांचे स्वप्न पूर्ण केले
शौनक शिरोळे हे औरंगाबादचे प्रख्यात नाट्यकर्मी डॉ. प्रभाकर शिरोळे यांचे चिरंजीव आहेत. रामगोपाल वर्मा यांच्याकडे त्यांनी ‘सरकार राज’ व इतर चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. ‘रणभूमी’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट. लातूरमध्येच ‘रणभूमी’चा बराचसा भाग चित्रित झाला. वडिलांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र, नोकरीच्या व्यापामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करत असल्याचे शौनक म्हणाले.