कलाकार होणे सोपे, पण दिग्दर्शकाची भूमिका पेलणे अवघड आहे. अनेक वर्षे अभिनय केल्यानंतर मी जेव्हा ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाचे केलेले दिग्दर्शन प्रेक्षकांना आवडले तेव्हा सर्व परीक्षा पास झाल्यासारखे वाटले, अशी भावना प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी बोलून दाखवली. शनिवारी (7 डिसेंबर) त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘दिग्दर्शन आणि अभिनय’ या विषयावर त्यांनी सखोल चर्चा केली. ती त्यांच्याच शब्दांत..
आजची पिढी लग्नाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते याबद्दल माझ्या मनात आलेले प्रश्न मी ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’च्या माध्यमातून मांडले. या चित्रपटाची कथा माझी होती. शिवाय चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा पहिलाच अनुभव असल्याने प्रेक्षकांना सहज समजेल अशा पद्धतीने विषय मांडण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते. ते मी पेलले आणि प्रेक्षकांकडून पसंती मिळाल्याचा विशेष आनंदही झाला. तरुण पिढीला नात्याची तितकीशी जाण नाही. मालिका पाहून, त्याचे अनुकरण करून नात्यातील दुरावा आणखीनच वाढला आहे. घटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. ही सर्व परिस्थिती पाहून माझ्या मनातील प्रश्न मी ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले.
पती-पत्नीच्या नात्यात सामंजस्य असणे गरजेचे आहे. दोघांत जुळवून घेण्याची क्षमता असेल तर टोकाचा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. वास्तविक घर आणि नोकरी करताना जशी महिलांना तारेवरची कसरत करावी लागते तसेच काळ बदलल्याने पुरुषांनाही घरकामात महिलांना मदत करावी लागत आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना पूरक आहेत, असा विचार करून महिलांनीही करिअर करावे. महिला घराबाहेर पडल्या तरी त्यांनी स्वत:चा आत्मसन्मान जपला पाहिजे. जग आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहील हे मुलींनी स्वत: ठरवावे. मी केलेली जिजाऊंची भूमिका मला सर्वात सर्वाधिक आवडते.
-शब्दांकन : सुलक्षणा पाटील