आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या संवर्धनासाठी स्वत:पासून करा सुरुवात, दाशरथे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमात किरण दाशरथे यांनी मार्गदर्शन केले.
औरंगाबाद - एखादी भाषा बोलणारा समुदाय स्वत:च या भाषेतून व्यक्त होण्यास कचरतो तेव्हा हळूहळू ती भाषा विस्मृतीत जाते. अशी स्थिती येऊ नये, याकरिता मराठीच्या संवर्धनासाठी स्वत:पासून सुरुवात करणे आवश्यक ठरते, असे प्रतिपादन दै. दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक मुद्रितशोधन विभागप्रमुख किरण दाशरथे यांनी केले.

शहरातील बलवंत वाचनालयात मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. यानिमित्त वाचनालयात आयोजित दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचे उद््घाटन दाशरथे यांनी केले. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष विठ्ठलराव कदम, कोशाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, नितीन बाकलीवाल, एम. ए. गफार, जनशिक्षण संस्थानच्या स्मिता अवलगावकर आदींची उपस्थिती होती. दाशरथे म्हणाले, भाषेमुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा प्रगत ठरला. इतर प्राणी विशिष्ट ध्वनी किंवा हावभावांद्वारे भावनांचे आदानप्रदान करतात. माणूस बोलू शकतो, त्यामुळे त्याने हळूहळू यथाकाल लिपी, वर्णाक्षरे यांच्याआधारे भाषेची रचना केली. त्याद्वारे तो संवाद साधू लागला. भाषातज्ज्ञांच्या अंदाजानुसार जगभरात सुमारे सहा हजार भाषा अस्तित्वात आहेत. परंतु, २२ व्या शतकापर्यंत त्यापैकी दोन हजार भाषाही टिकणार नाहीत. कारण संवादास अडचण येणारी किंवा उपजीविकेचे साधन बनू शकणारी भाषा तो समुदाय हळूहळू सोडून देतो. इथूनच त्या भाषेच्या ऱ्हासास सुरुवात होते. मराठी संस्कृती अन् भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेच्या संवर्धनाची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी डॉ. झंवर यांनीही मनोगत व्यक्त केले. आम्रपाली पगारे यांनी सूत्रसंचालन केले, तर लता पराते यांनी आभार मानले.