आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्मुख करणार्‍या मराठी कलाकृतींनी गाजला दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उमेश नामजोशी दिग्दर्शित ‘भाकरखडी सात किमी’, व्ही. शांताराम यांचा ‘माणूस’ आणि धनंजय कुलकर्णी यांचा ‘सांजपर्व’ या चित्रपटांनी औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला. अंतर्मुख करणार्‍या चित्रपटातून गहन संदेश, सशक्त अभिनय ही आजच्या चित्रपटांची बलस्थाने होती.
उमेश नामजोशींच्या ‘भाकरखडी’ची कथा एका अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी डॉक्टरच्या भोवती गुंफण्यात आली होती. अनिकेत विश्वासराव, रेणुका शहाणे, उदय टिकेकर, गणेश बाळापुरे, वीणा जामकर आणि डॉ. गिरीश ओक यांच्या सशक्त भूमिकांतून हा चित्रपट जिवंत झाला होता. डॉक्टरांच्या आयुष्याचा वेध घेणार्‍या या चित्रपटात एक चांगला विषय मांडण्यात आला. समाजात डॉक्टरांची भूमिका आणि त्यांच्या व्यवसाय घडणार्‍या घटना याची ही रंजक, मन हेलावणारी कहाणी होती. परिस्थितीमुळे एका डॉक्टरला आपल्या आयुष्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागते.
मात्र, जिथे सर्व काही उद्ध्वस्त होते, तिथे नव्या पर्वाची सुरुवात होते. अनेकांच्या आयुष्यात असे क्षण येतात, त्यातून आपण काय शिकावे, त्या परिस्थितीतही उत्तमरीत्या आपण मात करून बाहेर पडावे याची ही कथा पाहण्यासारखी आहे.
‘माणूस’पणाचे देखणे चित्रण
प्रभातचा माणूस हा 1939 चा चित्रपट. ‘माणूस’चे कथानक स्वातंत्र्यपूर्व काळातले. मात्र, त्यातील एक ना एक गोष्ट आजही लागू पडते. व्ही. शांताराम यांचा कॅमेरा पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांची पकड घेतो ते शेवटच्या फ्रेमपर्यंत. अनंत काणेकरांची पटकथा तुम्हाला इकडे तिकडे पाहण्याचे भान ठेवत नाही. पोलिस हवालदार गणपत (शाहू मोडक) आणि ‘तसली’ बाई मैना (शांता हुबळीकर) या दोन पात्रांभोवती फिरणारे कथानक माणसातील जनावरांचे आणि माणुसकीचे अनेक पैलू नकळत आपल्यासमोर मांडते.
गणपत पोलिसांच्या छाप्यातून मैनेला वाचवतो आणि त्यांच्यात हळूहळू प्रेमाचे नाते फुलत जाते. मात्र, मैनाचा सामाजिक दर्जा तिला माणूसपणापासून कसा दूर लोटतो याचे नितांत सुंदर चित्रण ‘माणूस’मध्ये घडते. ‘आता कशाला उद्याची बात’ हे आजही ताजे असणारे गाणे यातलेच. कृष्णधवल काळात अनेक र्मयादा असताना चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील बर्‍या-वाईट गोष्टींचे चित्रण कसे असावे याचा आदर्श परिपाठ ‘माणूस’ पाहिल्यानंतर घडतो. राग, लोभ, मोह, माया, प्रेम, मत्सर, विनोद आणि असूया अशा नवरसाचे सर्मपक चित्रण प्रभातच्या ‘माणूस’मधून घडते. म्हणूनच 70 वर्षांनंतरही आजच्या पिढीला खिळवून ठेवण्यात ‘माणूस’ यशस्वी ठरतो.
आजचे चित्रपट
सकाळी 9.30 ला प्यासा, दुपारी 12.45 ला टेरमिटारिया, दुपारी 2.45 मधू , 5 वाजता जयजयकार आणि शेवटी रात्री 8.15 वाजता मि. मुर्गन्स लास्ट लव्ह.