औरंगाबाद- अर्धसत्य सारख्या समांतर चित्रपटांतून इतिहास घडवणारा रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर आहे. रामा शेट्टीची त्यांनी केलेली भूमिका खलनायकांची लार्जर दॅन लाइफची प्रतिमा मोडणारी ठरली. सामाजिक जाणिवा अतिशय प्रखर असलेला हा मराठी अभिनेता होता, असे मत ज्येष्ठ प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी व्यक्त केली.
अमरापूरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या सिनेआयुष्यावर डॉ. घारे यांनी अमरापूरकर यांच्या अभिनयप्रवासाचा धावता वेध मांडला. ते म्हणाले, अहमदनगरातील नाट्य क्षेत्रातील वावरापासून मी त्यांना ओळखतो. अनेक स्पर्धा त्यांच्या नाटकांनी गाजवल्या होत्या. त्यानंतर व्यावसायिक रंगभूमी गाजवण्यासाठी ते मुंबईला गेले. सूर्यास्त, विठ्ठला आणि हँड्सपसारख्या नाटकांतून लक्षवेधी भूमिका केल्या. 'हँडसप' मध्ये गोविंद निहलानींनी त्यांना पाहिले आणि रामा शेट्टीची भूमिका मिळाली. पहिल्याच भूमिकेतून त्यांनी सिनेक्षेत्राची गणिते बदलली. खलनायकाची भूमिका कशी असावी याचे मापदंड त्यांनी बदलून टाकले. ह्यसडकह्णसारख्या चित्रपटातून तृतीयपंथीयाची त्यांनी साकारलेली भूमिका अंगावर काटा आणणारी होती. हिंदीत वावरत असतानाही त्यांचा मराठीपणा कायम होता. त्यांच्या हिंदीतला मराठीपणा सातत्याने जाणवायचा. मराठीचा लहेजा असलेली हिंदी ते बोलायचे. हिंदीत दबदबा निर्माण करणारे ते पहिले मराठी अभिनेते ठरले. बोलके डोळे हे त्यांचे शक्तिस्थान होते. भेदक नजरेतूनच ते समोरच्यांना गारद करत असायचे.
सामाजिक जाणिवा प्रगल्भ
अनेकदा त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असे. ते म्हणायचे,
आपण नाटकांतून सामाजिक विषय मांडतो. त्या समस्यांचा भाग झाल्याखेरीज त्याचे गांभीर्य आपल्या भूमिकांतून मांडता येऊ शकत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन असो िकंवा मेधा पाटकरांचे नर्मदा बचाव असो, अमरापूरकर स्वत: सहभागी झाले. फक्त आर्थिक मदत करून ते थांबले नाहीत, तर सहभाग घेऊन सक्रिय मदतही केली. रामा शेट्टीला माझे विनम्र अभिवादन.
प्रकट मुलाखतीतून उलगडला जीवनप्रवास
गेल्या वर्षी जागतिक भूलदिनाच्या निमित्ताने सदाशिव अमरापूरकर शहरात आले होते. या वेळी डॉ. सुहास जेवळीकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. वयोमानानुसार थकलेले अमरापूरकर त्या वेळी अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांशी संवाद साधत होते. आपला जीवनप्रवास त्यांनी अतिशय सहजपणे सर्वांपुढे उलगडला होता. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या आठवणी सांगताना त्यांचे मन हळवे झाले होते. ग्लॅमरच्या जगतात राहूनही त्या जगाचा थोडाही मोह नसलेला हा निगर्वी अभिनेता सहजच सर्वसामान्यांमध्ये मिसळला.
खलनायकांचा नायक गेला
चित्रपटांमध्ये खलनायकाला फक्त मार खाण्यापुरतेच महत्त्व असते. मात्र, अमरापूरकर यांनी त्यांच्या आगळ्यावेगळ्या अभिनयशैलीमुळे खलनायकांना उंचीवर नेऊन ठेवले. अमरीश पुरी यांच्या ताकदीच्या खलनायकी व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या होत्या. त्या अर्थाने ते खलनायकांचे नायकच होते, अशी भावना तरुण रंगकर्मी, चित्रपट कलावंतांनी व्यक्त केली. त्यापैकी काहींची निरीक्षणे पुढीलप्रमाणे...
कोणत्याही भूमिकेचे सोने करण्याची ताकद अमरापूरकरांमध्ये होती. त्यांना केवळ खलनायकाच्या भूमिकेपुरते मर्यादित ठेवणे चुकीचे ठरेल. कारण त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या, विनोदी भूमिकाही तेवढ्याच समर्थपणे केल्या. संजय सुगावकर, अभिनेता.
एक संवेदनशील कलावंत अशी त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी स्वत:चे विश्व अभिनयापुरते राहणार नाही याची काळजी घेतली. अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणाऱ्यांना त्यांनी मोठे बळ मिळवून दिले. सुधीर देऊळगावकर, प्रकाश योजनाकार