आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागोणीची वाडीतील भुताच्या टेकडीवर मराठी हॉरर चित्रपट, ख्यातनाम दिग्दर्शक राज दुर्गे यांनी केली पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - करमाड गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागोणीची वाडी (भुताची टेकडी) गावावरच मराठी भयपट तयार होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राज दुर्गे यांनी गावाला भेट दिली असून सप्टेंबरपासून चित्रीकरणही सुरू होणार आहे. ही भुताची टेकडी ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम प्रकाशात आणली. औरंगाबाद शहरापासून ३५ किलोमीटरवर करमाडपासून जवळच घनदाट जंगलात हे गाव आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी तिथे गेलेल्या डॉ. अमर देशमुख यांनी गावाजवळची टेकडी भुताची असल्याच्या अफवा एेकल्या. उत्तररात्री टेकडीवर विचित्र आवाजामुळे या अफवा पसरवल्या जात होत्या. यानंतर “दिव्य मराठी’च्या टीमने टेकडीवर मुक्काम करून प्राणीच ते आवाज काढत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. भय दूर होताच गावकरीही टेकडीवर आले. या घटनेवरील वृत्तही ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झाले. या बातम्यांना राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक राज दुर्गे यांनीही फेसबुकच्या माध्यमातून हे वृत्त वाचले. गौरव पवार या तरुण निर्मात्याने दुर्गे यांना टेकडीवर आणले. हा परिसर पाहून भारावलेल्या दुर्गे यांनी ‘दिव्य मराठी’च्या वृत्तांचा आधार घेत चित्रपट काढण्याचा मानस व्यक्त केला. या वेळी प्रसिद्ध मॉडेल गौतम पाटील उपस्थित होते. या सर्वांनी टेकडीवर रानात राहणाऱ्या डॉ. अमर देशमुख यांच्या टेकडीवरील झोपडीत गप्पा मारल्या.
चित्रपट प्राथमिक अवस्थेत
हा चित्रपट सध्या प्राथमिक अवस्थेतच असून टेकडी अन् या गावावर आमचा अभ्यास सुरू आहे. कथा-पटकथा स्वत: दिग्दर्शक राज दुर्गे लिहिणार आहेत. सप्टेंबरअखेर चित्रीकरण सुरू करण्याचा विचार आहे. या टेकडीसह माहूरच्या जंगलातही काही चित्रीकरण करण्याचा विचार आहे, अशी माहिती कार्यकारी निर्माता गौरव पवार यांनी दिली.

अशी असेल चित्रपटाची कथा
चित्रपटाची कहाणी डॉ. अमर देशमुख यांच्या बालपणापासून सुरू होते. राहता बंगला सोडून त्यांचा टेकडीवरचा प्रवास, घरच्यांचा विरोध, नातेवाइकांचे टोमणे, टेकडीवरच्या मेंढपाळांचा विरोध, मोर्चा, भूत शोधण्यासाठी अनेक रात्री प्राण्यांचा सामना करीत केलेली भ्रमंती, गावातील अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती ‘त्या’ एका बातमीने कशा दूर होतात असे रंजक कथानक आहे.

वजन कमी करण्याची सूचना
^राजदुर्गे हे टेकडीवर आले होते. त्यांनी खूप गप्पा मारल्या चित्रपट काढण्याची इच्छा व्यक्त केली. चित्रपटात माझी भूमिका असल्याने मला त्यांनी वजन कमी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार १५ किलो वजन कमी करण्याच्या कामाला लागलो आहे. -डॉ. अमर देशमुख
बातम्या आणखी आहेत...