आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक शोधताहेत तुकडीसाठी विद्यार्थी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठी माध्यमाचे आणि शासकीय शाळांमध्ये येणारे विद्यार्थी आता आयसीएससी, सीबीएसई आणि स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पळवले आहेत. आपल्या मुलाने इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यावे, असा अट्टहास धरला जात आहे. परिणामी मराठी शाळांतील शिक्षकांना तुकडी आणि नोकरी वाचवण्यासाठी विद्यार्थी शोधत भटकण्याची वेळ आली आहे.

17 जून रोजी सर्व शाळा सुरू झाल्या. तर शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी प्रवेश प्रक्रिया कराव्यात असा आदेश दिला. सध्या प्रवेश प्रक्रियेची स्थिती काय आहे, आरटीई कायद्याप्रमाणे प्रवेश होत आहेत का? हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने शहरातील ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, शारदा मंदिर, सरस्वती भुवन, आ. कृ. वाघमारे, शिवछत्रपती विद्यालय शाळांमध्ये पाहणी केली असता ज्या शाळांमध्ये काही वर्षांआधी हजार ते पाचशे विद्यार्थी प्रवेशासाठी रांगेत असायचे तिथे आज शंभर दोनशेच विद्यार्थी प्रवेशासाठी शाळेत येत असल्याचे दिसत आहे.

एवढेच नाही तर काही शाळांमध्ये एका वर्गात दहा ते पंधराच विद्यार्थी आहेत. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे जितके विद्यार्थी त्यानुसार शिक्षकांची संख्या हवी, विद्यार्थी असेल तरच शाळेची आणि वर्गाची मान्यता टिकेल. यामुळे शिक्षण संस्था आता अडचणीत सापडल्या आहेत. मान्यता टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचे सव्र्हे करा आणि नोकरी टिकवण्यासाठी विद्यार्थी शोधा अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे.

शिक्षकांची धडपड सुरू
आरटीईचे निकष पाळण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण आहे ते विद्यार्थीदेखील शाळांमध्ये येत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचा सव्र्हे, प्रवेशोत्सव विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. नोकरी आणि तुकडी वाचवण्यासाठी शिक्षकांचीच खरी कसरत सुरू आहे, तर दुसरीकडे मराठीपेक्षा इंग्रजी माध्यमालाच पालक पसंती देत आहेत. एस.पी.जवळकर, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर

इंग्रजी शाळांकडे ओढा
शहरात चांगल्या मराठी शाळा असतानाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात येणारा प्रवेशासाठीचा पालक आणि विद्यार्थी कमी झाला आहे. उज्‍जवला निकाळजे, शारदा मंदिर