आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi New Year Celebration Issue At Paithan, Divya Marathi

मराठी नववर्षाची प्राचीन साक्ष दुर्लक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- आजपासून शालिवाहन शके 1936 प्रारंभ होत आहे. पैठणनगरीतील शालिवाहन राजांनी सुरू केलेले हे शक म्हणजेच आपले मराठी नववर्ष. आपल्या विजयाचे प्रतीक आणि मराठी नववर्षाची साक्ष म्हणून त्या काळात पैठण येथे शालिवाहन राजांनी भव्य तीर्थस्तंभ उभारला. आजही हा स्तंभ भव्यतेची साक्ष देत असला तरी स्थानिक प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाचे मात्र याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. या तीर्थस्तंभाला 1996 मध्ये राज्य शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असले तरी कायम दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक स्तंभाची झीज होत आहे.

दक्षिणेवरील विजयाची आठवण : शालिवाहन राजाने दक्षिण भारतावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेला हा विजयस्तंभ तीन भागांत उभा आहे. यावर पाताळ, मृत्यू, स्वर्ग या तिन्ही लोकीच्या कल्पना अवतरलेल्या आहेत. तळाला मातृकामंडळ, साचेबद्ध भैरव, त्यांच्या गळ्यात मुंडमाळा, श्वान ही शिल्पे लक्ष वेधून घेतात. 12 खणांत विविध देव-देवतांच्या असलेल्या प्रतिमा आता पुसट होत चालल्या आहेत.

शक केले प्रारंभ : शालिवाहन राजाने संपूर्ण भारतात पराक्रम गाजवला होता. त्या वेळी दक्षिण भारतावर राजा सोमकांत तर उज्जैनला राजा विक्रमादित्य यांचे राज्य होते. राज्य विस्तारासाठी त्यांच्यात सतत लढाया होत. विक्रमादित्याने तेव्हा प्रतिष्ठान (आजचे पैठण) काबीज केले होते. त्याच वेळी शालिवाहन राजाने सैन्य उभारून शत्रूचा पराभव केला. तेव्हापासूनच शालिवाहन शक प्रारंभ झाल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.

तीर्थस्तंभाकडे वर्षातून केवळ एकदाच मराठी नववर्षदिनी लक्ष जाते. ही बाब दुर्दैवी आहे. विजयस्तंभ टिकला पाहिजे, अशी अपेक्षा इतिहास अभ्यासक डॉ. रा. र्शी. मोरवंचीकर यांनी व्यक्त केली. तर या तीर्थस्तंभ परिसराच्या साफसफाईकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिले.