आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोपर्यंत बाळाचा ‘पापा’ घेतला जाईल तोपर्यंत मराठीला मरण नाही - पाडगावकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विख्यात कवी, पद्मभूषण मंगेश पाडगावकर एका कार्यक्रमासाठी शनिवारी औरंगाबादेत आले. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठीच्या भवितव्यापासून नवा काव्यसंग्रह, साहित्य संमेलन, प्रेमकवितांमागची प्रेरणा या आणि अशा विषयांवर दिलखुलास मते व्यक्त केली. ती त्यांच्याच शब्दांत.

इंग्रजी जगाची वगैरे भाषा असो, पण जोपर्यंत तुम्ही पाळण्यातील बाळाचा ‘किस’ न घेता ‘पापा’ घ्याल तोपर्यंत मराठीला मरण नाही! मराठी भाषा टिकणारच. कारण ती समाजाची भाषा आहे. पण मराठीचे पावित्र्य सर्वांनीच राखायला हवे. अहो, परवा मी एका मिलिंद नावाच्या मुलावर भडकलो. त्याने त्याच्या नावातले ‘ली’ दीर्घ लिहिले होते हो! मराठी भाषा जाऊ द्या हो, पण स्वत:ची नावेतरी शुद्ध लिहिता आली पाहिजेत. मी वा. ल. कुलकर्ण्यांचा विद्यार्थी. ते शुद्ध मराठीबाबत अतिशय आग्रही. 14-15 वर्षांचा असताना मला कसले तरी बक्षीस मिळाले. पैशांऐवजी पुस्तक बक्षीस द्यायचं ठरलं. मी कागदावर नाव लिहून दिलं. फडक्यांचं ‘प्रतिभासाधन’ हे पुस्तक मागितलं. तो कागद देताच वा. लं.नी वाचून त्याचा बोळा करून माझ्या अंगावर फेकला. मी त्यात ना. सी. फडक्यांमधलं ‘सी’ र्‍हस्व लिहिलं होतं. ते म्हणाले, तुला नाव शुद्ध लिहिता येत नाही? त्यानंतर मी नाही चुकलो. मराठी हा भाषेचा नाही तर भावनेचा प्रश्न आहे. माझी मातृभाषा आहे ती.

प्रेमाने वाचले म्हणून...

आजकाल लोक वाचत नाहीत हो. कवीही वाचत नाहीत. आम्ही त्या काळी प्रेमाने कविता वाचायचो. कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’मधल्या जवळपास सगळय़ा कविता अशा तोंडावर असायच्या माझ्या. अभ्यास म्हणून सकाळी उठून पाठ नाही करीत बसलो. अहो, मी एका विद्यापीठात निवड समितीवर होतो. एका उमेदवाराला विचारले, कुसुमाग्रजांचं कोणतं पुस्तक वाचलंय? तर म्हणाला, ‘गर्जा जयजयकार’! म्हटलं, ती एका पुस्तकातील कविता आहे. त्यावर तो म्हणाला,‘काय असेल काहीतरी. मी फक्त कविता वाचतो. पुस्तकाचं नाव थोडेच वाचतो?’ आता बोला! ‘शुक्रतारा’ खूप जवळचे

मला माझ्या सगळय़ाच कविता आवडतात. अमुक एक असं कसं सांगणार? कारण ‘शुक्रतारा’ आणि ‘सलाम’ या अगदी भिन्न प्रकृतीच्या कविता आहेत. पण मला ‘शुक्रतारा’ खूप आवडते. र्शीनिवास खळय़ांनी काय सुंदर चाल दिलीय. ‘वाकला फांदीपरी फुलांनी जीव हा, तू अशी जवळी राहा’ ही त्यातली काय सुंदर ओळ आहे! मला माझ्या कुठल्याच गाण्यानं ते साकार होत असताना त्रास दिला नाही. खरं सांगायचं तर माझ्या गाण्यानं इतरांनाच फार त्रास होतो! संमेलनांविषयी

मी साहित्य संमेलनांना फारसा जात नाही. दोनदाच गेलेलो आहे. एकदा कुसुमाग्रज अध्यक्ष असताना गेलो होतो. विश्व साहित्य संमेलन वगैरे ठीक आहे. यानिमित्तानं त्या त्या देशातील मराठी माणसं एकत्र येतात, आपल्या आवडत्या लेखकाला भेटतात, ऐकतात. आपल्याकडे त्यात नवं नाही, पण त्यांना त्यांचं खूप कौतुक असतं.
अखेरची वही

सध्या बालकवींवर एक पुस्तक लिहायला घेतलंय. रजिस्टरची 128 पानं लिहून झाली आहेत. मोठं पुस्तक होणार आहे ते! आणि हो, एक कवितांचं पुस्तक छापायला जातंय. नाऊ आय अँम 84 इयर्स ओल्ड. आता लिहिणं होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून त्या संग्रहाचं नाव ठेवलंय ‘अखेरची वही’. पण शंकर वैद्य मला म्हणाले, ‘पाडगावकर, तुम्ही कविता लिहीतच राहणार हो. तुम्ही पुस्तकाचं नाव ‘अखेरची वही भाग 1’ असं ठेवा!’

शब्दांकन - महेश देशमुख