आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडावा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अ.भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीद्वारेच निवडावा, असे मत साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषदेतून शुक्रवारी डॉ. काळे यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरला. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

काळे यांचे सूचक म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे, तर अनुमोदक फ. मुं. शिंदे, डॉ. छाया महाजन, के. एस. अतकरे, श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे आहेत. काळे म्हणाले, मराठी साहित्य संमेलन हे साहित्य-संस्कृतीच्या चिंतनाचे सर्वश्रेष्ठ व्यासपीठ आहे. त्यावरून आपले विचार मांडता यावेत. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी वचनबद्ध असणाऱ्या, वाड्मय आणि संस्कृतीचे परस्परसंबंध जाणणाऱ्या क्रियाशील सहृदय रसिकांशी संवाद साधून योग्य दिशा ठरविता याव्यात यासाठी आपण या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी उभा आहे.

मराठीला अभिजात दर्जा मिळेल : मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा याविषयी विचारले असता ते म्हणाले, मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्रस्तावास मंजुरी मिळाली पाहिजे. तो नक्कीच मंजूर होईल, याची खात्री वाटते. असे झाल्यास केंद्राकडून मदत मिळेल. मराठीचे संवर्धन करण्यासाठी विविध उपाययोजना करता येईल. संमेलनाध्यक्ष हा ललित लेखकच असावा, अशीही चर्चा झाली होती. या प्रश्नावर काळे म्हणाले की, साहित्याचा एकच प्रांत नसतो. भाषायात्री, काळयात्री, समीक्षात्मक आणि सृजनात्मक दोन्हींची आवश्यकता असतो. साहित्य समीक्षेची परंपरा प्राचीन आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारात लेखन करणारा साहित्यिक अध्यक्ष असावा ही चर्चा व्यर्थ आहे.
सहिष्णुता आणि असहिष्णुता या वादामुळे अनेक मान्यवर लेखकांनी आपले पुरस्कार परत केले होते. या विषयी काळे यांना विचारले असता, ते म्हणाले, इतक्या मोठ्या प्रमाणात पुरस्कार वापसीनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया महत्त्वपूर्णच आहेत. परंतु पुरस्कार वापसीपेक्षाही मत व्यक्त करण्याचे वेगळे मार्ग असू शकतात. आज इंग्रजी भाषेचा प्रभाव मराठीवर पडत आहे का? यावर काळे म्हणाले की, मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे आक्रमण होत आहे. वैश्विक ज्ञान प्राप्तीसाठी इंग्रजीशिवाय पर्याय नाही. मराठीतून पालक इंग्रजी शाळेत मुलांना टाकताहेत यात त्यांची काही चूक नाही. उलट दोन्ही भाषा आज आवश्यक आहेत. बदलत्या साहित्य शैलीविषयीदेखील काळे यांनी मत मांडले. ते म्हणाले की, साहित्य लेखनात नवा प्रवाह, नवे विषय येणे शैलीत बदल होणे हे साहित्याच्या जिवंतपणाची लक्षणे आहेत. नवनवीन साहित्य प्रवाहामुळे सर्जनशीलता येते. बदलत्या भाषेचा परिणाम आकृतिबंधावरही होतो, असेही काळे म्हणाले.

काळे यांनी यापूर्वी नागपूर साहित्य परिषदेतूनही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. लवकरच पुणे साहित्य परिषदेतूनही ते अर्ज भरणार आहेत. त्यांनी आपला अर्ज मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे सादर केला. या वेळी संजीवनी तडेगावरक, रामचंद्र काळुंखे, प्रा. विष्णू सुरासे, जीवन कुलकर्णी, डॉ. दिलीप बिरुटे यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...