आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्ग नव्हे, माणूसच झाला बेइमान, ज्येष्ठ नागरिक रामराव लोखंडे यांचे हृदयस्पर्शी उद्गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले आडगाव निपाणी हे समृद्ध गाव. मोसंबीची 20 हजारांवर झाडे, दुभत्या गाई, त्यामुळे खिशात खळखळणारा पैसा हे चित्र गेल्या पावसाळ्यापर्यंत होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारली. जमिनीतील पाणी संपले, बागा वाळू लागल्या अन् बघता बघता गाव बकालपणाच्या दिशेने निघाले. 90 टक्के झाडे जळाली असून उर्वरित दोन हजार झाडेही त्याच मार्गावर आहेत. 1972 चा दुष्काळ अनुभवलेले ज्येष्ठ नागरिक रामराव लोखंडे यांच्या मते याला माणूसच कारणीभूत आहे. गेल्या काही दिवसांत बदलला तो फक्त माणूस, निसर्ग नव्हे. माणसाच्या बेदरकारपणामुळेच ही वेळ आली आहे.

विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) या गावाची जमिनी संपादित केली जाणार होती. 2007 मध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या आंदोलनामुळे जमीन वाचली. आज त्याच गावातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जोशी येथे आले होते. त्यांच्यासोबत गावात दाखल झालेल्या पत्रकारांनी येथे पाहणी केली. ज्येष्ठांशी संवाद साधला अन् एका समृद्ध गावाचा प्रवास कसा सुरू आहे, याची कहाणी समोर आली.

भय येथे संपत नाही..

पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेली झाडे जळालेली बघताना शेतकर्‍यांना प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी येथील भय अजून संपलेले नाही. कारण ही झाडे शेतात उभी आहेत. त्यावर कुर्‍हाड चालवता येत नाही. ती जेसीबीच्या मदतीने उपटून फेकावी लागतात. त्यासाठी एकरी 25 हजार रुपये खर्च येतो. बागा वाचवण्याच्या प्रयत्नात कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याकडे आज एवढी रक्कम असणे अशक्य कोटीतील बाब आहे. त्यामुळे पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर अजूनतरी त्यांच्याकडे नाही. झाडे तोडण्यासाठी कर्ज काढावे लागेल अशी शक्यता आहे.

दोन वर्षांपासूनच दुष्काळाचे चटके सोसतोय शेतकरी

दोन वर्षांपासून या भागातील पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे पाण्यासाठी पळापळ सुरू होती. त्यातील काहींनी गतवर्षी ठिबक केले. यंदा जमले नाही पुढच्या वर्षी पैसा हाती आल्यानंतर आपणही ठिबक करू असा येथील शेतकर्‍यांच्या होरा होता, पण त्याआधीच सर्व काही हातून निघून गेले. गतवर्षीच जर ठिबक केले असते तर कदाचित यंदा बाग वाचली असती, आता ठिबकसाठीही पैसे नसल्याचे तरुण शेतकरी शिवाजी डकले यांनी सांगितले.

दुग्धव्यवसाय आतबट्टय़ाचा

सध्या दुधाला 15 रुपये प्रतिकिलो असा शासकीय भाव मिळतो. खर्चाचा विचार केला तर एक पेंढी 8 रुपयांना बाटा 1800 रुपये क्विंटल. हिरवा चारा मिळत नाहीच पण मिळाला तर भावाचे विचारूच नका. खुंट्यावरची गाय विकायची कशी, म्हणून हा व्यवसाय सुरू आहे. हेही दिवस जातील या भरवशावर दुधाचा रतीब सुरू ठेवण्यात आल्याचे कोंडिबा हाके यांचे म्हणणे आहे.

मुलींचे लग्न होईना

हाती पैसे नसल्यामुळे या गावातील मुलींची यंदा लग्न झालेली नाहीत. बहुतांश वधुपित्यांनी लग्नाचा निर्णय पुढील वर्षावर ढकलला आहे. दुसरीकडे गावातील मुलांना मुली मिळेनाशा झाल्या आहेत. वाळलेल्या बागा बघून मुलींचे वडील आमच्या गावातील मुलांना मुलीच देत नाहीत, असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. हे वास्तव फक्त आडगावचेच नसून जिल्ह्यातील बहुतांश भागातील असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकेवाले उभे करेनात

येथील शेतकरी दररोज बँकेत चकरा मारतात. नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झाली का असा पहिला प्रश्न त्यांचा असतो अन् आणखी कर्ज मिळेल का असा दुसरा प्रश्न. शेतकर्‍यांच्या नित्याच्या प्रश्नांना कंटाळून बँकेचे अधिकारी, कर्मचारी आता बँकेतच येऊ देत नाहीत, असे र्शीकांत हाके यांनी सांगितले.

1972 च्या दुष्काळात मोसंबीतून मिळाले होते 14 हजार

ज्येष्ठ नागरिक आणि गावचे माजी सरपंच रामराव लोखंडे हे 1972 च्या दुष्काळाचे साक्षीदार आहेत. ते म्हणतात त्या वर्षी पाऊसच झाला नाही, तरीही मला फळबागेतून 14 हजार रुपये मिळाले होते. तेव्हाची परिस्थिती लक्षात घेता ही रक्कम खूप मोठी होती. कापूसही बर्‍यापैकी झाला होता. गेल्या 40 वर्षांत प्रगती खूप झाली; पण बाग वाचवता आली नाही, अशी खंत त्यांना आहे.

असे आहे चित्र

रामराव लोखंडे- वय- 80 वर्षे. शेतात 15 वर्षे वयाची मोसंबीची एक हजार झाडे. त्यातील 800 जळाली. 200 अजून तग धरून आहेत. गतवर्षी त्यांना अडीच लाख इतके उत्पन्न झाले होते. यंदा दमडीही नाही.

शिवाजी डवले- 7 वर्षांची 204 झाडे- गतवर्षीचे उत्पन्न सव्वा लाख. यंदा आता ठिबक करण्यासाठीही खिशात पैसे नाहीत.

बाबासाहेब नांगरे- 9 वर्षांची 800 झाडे. सर्वच्या सर्व अंतिम घटका मोजताहेत. गतवर्षी पावणे तीन लाख रुपयांची कमाई झाली होती. यंदा काहीही नाही.

आपणच बेइमान
सर्व जण निसर्गाला दोष देतात, पण प्रत्यक्षात निसर्ग बदलला नाही. बदलला तो माणूस. तोच निसर्गाशी खेळला. पाण्याचा उपसा करताना कसलाही विचार त्याने केला नाही. आता पुन्हा निसर्गाला दोष देतोय. पाणी अडवणे शिकला नाही. उशिरा जाग आली. या वर्षी गावातून वाहणार्‍या नाल्यावर तीन सिमेंट बांधारे बांधले; पण नाल्याला पाणीच आले नाही. आधीच तसे केले असते तर म्हणत पश्चाताप करतोय आम्ही. मी निसर्गाला अजिबात दोष देणार नाही. एक एकर बागेसाठी चार बोअर घेतले पण चार बोअरचे पाणी वाचवले नाही. आता ठिबकसाठीही पाणी शिल्लक राहिले नाही. असेच चित्र राहिले तर गावात राहणार कोण असा प्रश्न आहे. रामराव लोखंडे, ज्येष्ठ नागरिक.