औरंगाबाद- वाळूज औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या मराठवाडा ऑटो क्लस्टरचे लोकार्पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे शहरात येणार आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली उद्योगपती राम भोगले, सीएमआयएचे मुनीश शर्मा यांनी आज दिल्लीत या मंत्र्यांसमवेत चर्चा केली. त्यात त्यांनी जुलैला शहरात येण्याचे मान्य केले.
संरक्षण रेल्वे या दोन प्रमुख खात्यांचे मंत्री यानिमित्ताने शहरात येणार असून ते येथे आल्यानंतर शहरात लष्कराचा एखादा प्रकल्प असावा तसेच रेल्वे विद्यापीठही उभारण्यात यावे या मागणीवरही चर्चा होणार असल्याचे खा. खैरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता (पोटेन्शियल) आहे. ते मंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी एखादे प्रदर्शनही येथे भरवण्याचा विचार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. दोन मंत्री शहरात आल्यानंतर त्यांच्याशी विस्तृत चर्चा होईल तसेच आणखी काही उद्योग शहरात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
प्रभू तसेच पर्रीकर यांनी बुधवारी भेटण्याची वेळ दिल्याने उद्योजकांसह खा. खैरे मंगळवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. दुपारनंतर या शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. या दोघांनी जुलैला औरंगाबादेत येण्याचे मान्य केले. मराठवाडा ऑटो क्लस्टरचे लोकार्पण हा मुख्य कार्यक्रम असला तरी त्यानिमित्ताने येथे अन्य उद्योग कसे आणता येतील, यासाठी उद्योजक तसेच खा. खैरे प्रयत्नशील आहेत.
खा. खैरे म्हणाले, औरंगाबादेत रेल्वे विद्यापीठ असावे, अशी मागणी मी लोकसभेत केली होती. त्यावर विचार केला जाईल, असे उत्तर मंत्र्यांकडून मिळाले होते. आता रेल्वेमंत्री प्रभू आपल्या शहरात येणार आहेत. तेव्हा या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा होईल. अन्य काही संघटना, उद्योजकांशी ते चर्चा करतील. त्यातून सकारात्मक बाब समोर येऊ शकेल.
दुसरीकडे संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्याशीही चर्चा होणार आहे. येथे लष्कराची छावणी असल्याने लष्करी साहित्यनिर्मितीचा कारखाना उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे. त्यावरही या दौऱ्यात चर्चा होईल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
मोदींसाठी प्रयत्न सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यावे यासाठी उद्योजक तसेच लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी त्यांनी यासाठी प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. अजून एक महिन्याचा कालावधी असून या काळात पुन्हा प्रयत्न होऊ शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.