आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Drought Industrial Water Supply Only 10%

दुष्काळाचे पैसे दुबार पेरणीतच आटणार; घरगुती, औद्योगिक वापरात १०% पाणी कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या २३ दिवसांपासून पावसाचा टिपूसही नसल्यामुळे सलग चौथ्या वर्षी भीषण दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. जुलैचा दुसरा आठवडा संपला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पेरणी झालेल्या ३२ लाख ५३ हजार ८०० हेक्टरवरील कोवळी पिके माना टाकू लागली आहेत. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांत केवळ ६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर अजूनही २६ टक्के म्हणजेच ११ लाख ४० हजार २०० हेक्टर शेतीवर पेरणीच झालेली नाही. मराठवाड्यातील ७४ टक्के शेतीवर दुबारपेरणीचे संकट आले असून प्रशासन तातडीच्या उपाय योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातावर गेल्यावर्षीचा दुष्काळ, पीक विमा आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईचे पैसे ठेवून बोळवण करणार आहे. शेतकऱ्यांच्या हाती येणारा हा पैसा दुबार पेरणीतच आटणार असल्याने उर्वरित शेती कामासाठी त्याच्यावर दुसऱ्यांच्याच हातातोंडाकडे पाहण्याची वेळ येणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचे सोमवारी सांगितले. दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे मनोधैर्य खचू देऊ नका, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना देतानाच गेल्या वर्षीच्या दुष्काळनिधी पोटी आलेले ३९२ कोटी रुपये, मागच्याच हंगामातील पीक विमा योजनेचे ११०० कोटी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईच्या ८ कोटी रुपयांचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुबार पेरणीच्या संकटावरील प्रशासनाची ही तातडीची उपाययोजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारकीच आहे. शेतकऱ्यांच्या हाती पडणारा हा संपूर्ण पैसा दुबार पेरणीतच आटणार असून त्यानंतर पिकांची देखभाल,निंदणी-खुरपणी आणि खतपाण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहण्याची शक्यता नसल्याने या संकटाला कसे तोंड द्यायचे हा मोठा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षीचा दुष्काळ निधी, पीक विमा आणि गारपिटीची नुकसान भरपाई देण्यासाठी आधीच विलंब लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागच्या हंगामासाठी केलेली उसनवारी आणि कर्जेही फिटली नाहीत आणि ही रक्कम जूनमध्ये पेरणीच्याही कामी आली नाही. त्यामुळे या पेरणीसाठी त्याच्यावर पुन्हा उसनवारी करण्याची आणि कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यातच आता सरकार दुबार पेरणीच्या संकटावर तातडीची उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांचेच मागच्या हंगामातील पैसे हातावर टेकवण्याच्या तयारीत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाबरोबरच सुल्तानी संकटालाही सामोरे जावे लागणार आहे.

मराठवाड्यात खरिपाचे ४३ लाख ९४ हजार हेक्टर पेरणीचे क्षेत्र आहे.पैकी ७४ टक्के म्हणजेच ३२ लाख ५३ हजार ८०० हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली. त्यापैकी उस्मानाबाद जिल्ह्यात ४८, परभणीत ४९ ,लातूरमध्ये ५८ आणि बीडमध्ये ७९ टक्के पेरणी झाली आहे. या चारही जिल्ह्यांत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद ८६ मिमी, बीड ८१, परभणी ८९ आणि लातूरमध्ये १०० मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यांत सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. मराठवाड्यातील ११ लाख ४० हजार २०० हेक्टर शेती अद्यापही पेरणी अभावी तशीच पडून आहे.

जायकवाडी जाणार मृत साठ्यावर
पैठण - मराठवाड्याची १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर शेती ओलिताखाली आणणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी अर्ध्या टक्क्यापेक्षा खाली गेली असून, ४८ तासांत धरण मृतसाठ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचे पाणी बंद करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
पुढील स्लाइडवर,१०% पाणी कपात