औरंगाबाद - मराठवाड्यातील पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची कबुली महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
पीक कापणीचा प्रयोग झाल्यानंतर पैसेवारीच्या आधारे १५ नोव्हेंबरनंतर दुष्काळजन्य स्थिती जाहीर केली जाईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खडसे पहिल्यांदा शहरात आले होते. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला, तर दुष्काळी स्थितीसंदर्भात येत्या आठ दिवसांत विभागनिहाय बैठका घेणार असल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा अायुक्त प्रकाश महाजन, जि.प.चे सीईओ दीपक चौधरी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
जायकवाडीच्या प्रश्नावर राज्यस्तरावर बैठक घेऊन जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पावसाळ्यात छोटे नाले, ओढे, गाव, तलाव, छोटे बंधारे अशा सर्वच ठिकाणी पाणी अडवण्याचा कार्यक्रम केला, तरच शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळू शकेल, असे त्यांनी सांिगतले.