औरंगाबाद- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा दैनंदिन कारभार तूर्तास आमदार सतीश चव्हाण यांच्याकडेच राहील. फेरफार अर्ज (चेंज रिपोर्ट) फेटाळण्याच्या धर्मादाय उपायुक्तांच्या निर्णयाविरोधात आमदार सतीश चव्हाण यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडे अपील केले होते. सदर अर्ज फेटाळण्यात आला, पण धोरणात्मक निर्णय घेता दैनंदिन कामकाज सध्याच्या कार्यकारी मंडळाला पाहण्याची मुभा देण्यात आली. सहधर्मादाय आयुक्त व्ही. एस. पाडळकर यांनी हा निकाल दिला. आ. चव्हाण हे मंडळाचे विद्यमान सरचिटणीस आहेत.
१० जुलै २०१३ रोजी कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली होती. निवडण्यात आलेल्या कार्यकारिणी मंडळास मान्यता फेरफारसाठी चव्हाण यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे अर्ज केला होता. यास मधुकरअण्णा मुळे, किरण जाधव, चंद्रशेखर शेलार यांनी आक्षेप घेतला. कार्यकारिणी निवडणूक न्यासाचा नियम नियमावली आणि कायदाभंग करणारी असल्याचे आक्षेप अर्जात नमूद केले होते. सदर निवडणूक बेकायदेशीर ठरवून धर्मादाय उपायुक्तांनी मंडळाचा फेरफार अर्ज फेटाळला. या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती चव्हाण यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडे केली होती. परंतु हा अर्ज सहधर्मादाय आयुक्तांनी फेटाळला. विद्यमान कार्यकारी मंडळाने संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहावे, परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये. तसा निर्णय घेण्याची गरज असल्यास आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले.