आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाचा निर्धार : आम्ही हिंमत हरलो नाही, हरणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गारपीट असो नाहीतर वादळी वारे, अवकाळी पाऊस. अशा अस्मानी संकटांनी आम्ही हिंमत हरलो नाही, हरणार नाही, अशा शब्दांत शेतकर्‍यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. या लढाईसाठी आम्हाला वैज्ञानिक, शास्त्रज्ञ व अधिकार्‍यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एकीकडे गारपिटीच्या तडाख्याने पराभूत होत जीवनाचे दोर कापण्याचे सत्र काही शेतकर्‍यांनी सुरू केले असताना या शेतकर्‍यांचे बोल प्रेरणादायी असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरल्लू म्हणाले.

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी-शास्त्रज्ञांच्या सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी निर्धाराचे बोल ऐकवले. तेव्हा सार्‍यांच्याच माना उंचावल्या होत्या. शिरेगावच्या महिला शेतकरी व सरपंच कविता कर्‍हाळे, ढवळापुरी येथील सिद्धेश्वर पुंगळे, अंबडचे रवींद्र गोल्डे आदींनी शास्त्रज्ञांपुढे समस्या मांडल्या. यातून बाहेर पढण्यासाठी आपण काय करणार, असाही सवाल केला.

शेकटा येथील शेतकरी अभय राजपूत म्हणाले की, माझ्याकडे 20 एकर शेती आहे. पाच वर्षापूर्वी 769 डाळिंबाचे वृक्ष लावले होते. गारपिटीत त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता आम्हाला शासनाच्या मदतीचा काहीच फायदा नाही. तरीही लढण्याची उमेद हरलेलो नाही. मात्र, किमान आम्हाला संकटाची पूवर्सूचना मिळावी. 50 एकर शेती केल्यापेक्षा कमी शेतीत शेडनेट, पॉली हाऊस द्या. त्यामध्ये कोणते पिक घ्यावे, याविषयी मार्गदर्शन करा. आम्ही पिकवतो अन व्यापारी किंमत ठरवतात, ही पद्धत बंद करा.

कारभारणींना विश्वासात घ्या : पुरुषांपेक्षा महिला शेतात अधिक राबतात. मात्र, अनेक जण निर्णयात कारभारणींचा विचारच घेत नाहीत. पुढे चालून येणार्‍या अडचणी टाळण्यासाठी कारभारणींना विश्वासात घ्या. पिकापासून ते खतापर्यंतच्या निर्णयात त्यांचाही सल्ला घ्या, अशी सूचना कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार विभागाचे माजी संचालक डॉ. जी. एस. जाधव यांनी केली.

अधिकार्‍यांनो, शेतात या
आम्ही जगण्याची लढाई लढतच राहणार. फक्त आम्ही पिकवलेल्या मालाची किंमत व्यापार्‍यांना ठरविण्याचा अधिकार देऊ नये. कृषी विभागाने कार्यालयात बसून सल्ले देण्यापेक्षा शेतात जाऊन समस्या जाणून घ्याव्यात.’ अण्णासाहेब जाधव, शेतकरी

आत्महत्येने काय होणार?
शेतकर्‍यांना पुरेशी वीज मिळत नाही. कर्जास टाळाटाळ होते. मालाला भाव मिळत नाही. नैसर्गिक संकटांनी घेरले गेलो तरी जीवन संपवण्यापेक्षा त्यातील संकटाशी दोन हात करण्यात खरा पुरुषार्थ आहे.’ शेख कय्युम, शेतकरी