आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याला मिळणार ४५० कोटी रुपयांची वीज सवलत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औद्योगिक वीज वापराच्या पॅकेज ऑफ इनिशिएटिव्ह संदर्भातील समितीच्या अहवालात शिफरशी केल्यानुसार राज्य सरकारने हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. समितीने मराठवाड्यातील उद्योगांना एक रुपया ते पावणेदोन रुपयांपर्यंत युनिटमागे वीज सवलतीच्या शिफारशी केल्या असून त्या सरकारवर ताण पडणाऱ्या नसल्यामुळे तरतूद करण्यात आली आहे. साधारण मराठवाड्याच्या वाट्याला ४५० कोटी रुपयांच्या सवलती मिळतील, अशी माहिती समितीचे सदस्य राम भोगले यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

मराठवाडा आणि विदर्भाला वीज सवलतीसाठी एक हजार कोटी रुपये लागणार असल्याची शिफारस समितीने केली होती. विशेष म्हणजे वीज सवलतीसाठी एक हजार कोटी लागणार असल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने डिसेंबरला प्रकाशित केले होते. त्यानुसार अर्थसंकल्पातही एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली.

मोठ्या उद्योगांना मिळणार सर्वाधिक लाभ : या सवलतीनुसार, मोठ्या प्रमाणात वीज लागणाऱ्या आणि रात्रीही विजेचा वापर करणाऱ्या उद्योगांना युनिटमागे दीड ते पावणेदोन रुपयांपर्यंत विजेच्या दरात सूट देण्याच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. मोठे उद्योग, ऑटोमोबाइल तसेच स्टील उद्योगालाही याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जालन्यातील स्टील उद्योगाला याचा फायदा होणार आहे. विजेचा वापर कमी असलेल्या लघुउद्योगांना रुपयापर्यंतच्या सवलती द्याव्यात, अशी शिफारस समितीने केली आहे.

जिनिंग फॅक्टरीला मिळणार सवलतीचा विशेष लाभ : मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग फॅक्टरीची संख्या मोठी आहे. मात्र, या जिनिंगला वीजदर सवलतीचा लाभ मिळत नव्हता. इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी आणि सोलापूर येथील यंत्रमागासाठी १४०० कोटींची सवलत देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील जिनिंग फॅक्टरीला सवलत देण्याची योजना समितीने सुचवलेली आहे. त्यानुसार या जिनिंग फॅक्टरीला दीड ते रुपयांपर्यंत वीज सवलत देण्याच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात ४५० पेक्षा अधिक जिनिंग फॅक्टरी असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सरकारला जास्त कर मिळेल : सरकारवर अधिक बोजा पडणार नाही याची काळजी घेतल्यामुळेच शिफारशीइतका निधी मंजूर झाला आहे. वीज सलवतीमुळे राज्याला मराठवाडा, विदर्भातून मिळणारा व्हॅट आणि एक्साइज वाढेल. सध्या आठ हजार कोटींचा एक्साइज ८८०० कोटी रुपयांपर्यंत वाढेल. त्यामुळे आठशे कोटी कर रूपातून वाढ सरकारलाच मिळणार आहे. या वीज सवलतीमुळे इतर उद्योगांबरोबर प्रोसेसिंग, जिनिंग उद्योगालादेखील लाभ मिळणार आहे. - राम भोगले, समितीचे सदस्य

विदर्भाला झुकते माप
वीजदराच्या सवलतीबाबत समितीने सूक्ष्म, लघु, मोठे आणि मेगा प्रोजेक्टसाठीदेखील विजेची शिफारस केली आहे. कोणत्या उद्योगासाठी किती सवलत मिळणार हे अजून निश्चित झाले नसले तरी समितीच्या शिफारशीनुसार एक रुपया ते पावणेदोन रुपयांच्या सवलती विजेचा वापर अधिक असलेल्या उद्योगांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यापेक्षा विदर्भात उद्योग अधिक असल्याने साधारण ५५० कोटी रुपयांच्या सवलती विदर्भाला मिळण्याची शक्यता आहे.

उद्योग आकर्षित होतील
उद्योगांना मिळणाऱ्या वीज सवलतीमुळे नवीन उद्याेग आकर्षित होतील. त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळेल. तसेच सद्य:स्थितीत असलेले उद्योग आणखी स्पर्धात्मक होतील. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. सूक्ष्म, लघु, मोठे तसेच मेगा प्रोजेक्टलाही त्याचा लाभ व्हावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतीवर उपजीविका नसल्यामुळे असलेल्या उद्योगांना जगवणे, वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. - मुकुंद कुलकर्णी, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ
बातम्या आणखी आहेत...