आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathwada Graduate Constituency Election Analysis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदवीधर निवडणूक : फंदफितुरीने लागला भाजपच्या किल्ल्याला सुरुंग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा पदवीधरमध्ये उमेदवार घोषित करण्यास वेळ लागला, मतदारांशी संपर्क साधणे शक्य झाले नाही, अशी शिरीष बोराळकरांच्या पराभवाची कारणे सांगितली जात आहेत. प्रत्यक्षात भाजपमधील फंदफितुरीनेच भाजपच्या किल्ल्याला सुरुंग लागल्याचे स्पष्ट होत आहे. सहा महिन्यांपूर्वी काही बड्या पदाधिकार्‍यांनी फितुरीची वात पेटवली होती. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनामुळे ती विझविणे बोराळकर समर्थकांना शक्य झाले नाही, असाही सूर भाजपच्या चिंतन गोटातून येत आहे.

देशात मोदींची आणि मराठवाड्यात मुंडेंच्या सहानुभूतीची लाट असल्याने बोराळकरांचा विजय निश्चित, असे मानले जात होते. राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना त्याचा अचूक अंदाज आला होता. दोन ‘एम’ लाटा थोपवण्यासाठी युतीचे काही कार्यकर्ते, पदाधिकारीच आपल्या बाजूने राहतील, याची काळजी त्यांनी सुरुवातीपासून घेतली. मुंडेंच्या निधनानंतर तर याबाबत ते अधिकच सतर्क झाले होते. लोकनेते मुंडे यांना विनम्र श्रद्धांजली असे जाहिरात फलक त्यांनी 3 जून रोजी दुपारी बाराच्या सुमारासच लावले होते. यामुळे बोराळकरांच्या विरोधात आधीपासूनच सूर आळवणारे कट्टर मुंडे समर्थक भावनावश झाले. त्यातील अनेकांनी मुंडेंच्या अपघातामागे गडकरी असल्याचा सूर लावला. बोराळकर गडकरींचेच उमेदवार असल्याचा ठपका ठेवत मतदानाकडे पाठ फिरवण्याचे संकेतही दिले होते. बाद झालेली 12 हजार 261 मतांमागे हेच कारण असावे, असे भाजपच्या गोटातूनही सांगण्यात येत आहे.

सुरुंगाची पेरणी आधीच
मराठवाडा पदवीधरमधील भाजपच्या गडाला सुरुंग लावण्याची सुरुवात मुंडे असतानाच झाली होती. सप्टेंबर 2013 मध्ये मुंडे औरंगाबादेत आले असताना इच्छुक उमेदवारांची यादी त्यांच्यापुढे सादर झाली होती. त्यावेळी त्यांनी दोन आठवड्यात उमेदवार जाहीर करतो, असे घोषित केले होते. प्रत्यक्षात मतदानाला 25 दिवस शिल्लक असताना बोराळकरांच्या गळ्यात माळ टाकण्यात आली. एवढा उशीर होण्यामागे नेमके काय कारण होते, याचा उलगडा प्रदेशस्तरावरील एका पदाधिकाºयाने केला. त्याने सांगितले की, उमेदवारांची यादी मुंडेंकडे गेल्यावर पदाधिकाºयांच्या एका गटाने त्यांची मुंबईत भेट घेतली. सामान्य कार्यकर्त्यांसोबत नित्यनेमाने उठबस करणारा, आमच्यासारख्या आवडी-निवडी असणाºयाच उमेदवारी द्यावी. गुलाल उधळून झाल्यावर येणारा, टीव्हीवर दिसणारा, फक्त मिडियाशी मधुर संबंध असणाºयाला मैदानात उतरवले तर कठीण होईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्याचवेळी श्रीकांत जोशी आणि बोराळकर यांचा पत्ता कट झाला आणि फंदफितुरीचे मुळे रोवली गेली होती.

बड्यांमधील संघर्षही कारणीभूत
एकीकडे इच्छुक उमेदवार मुंबई, परळीच्या फेर्‍या करत असताना दुसरीकडे भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये उमेदवार ठरवण्यावरून संघर्ष सुरू झाला होता. भाजपमधील कोणालाही उमेदवारी दिली तरी तो गटबाजीमुळे टिकणार नाही, याची जाणिव मुंडेंनाही होती. म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना चव्हाणांचे कट्टर विरोधक सचिन मुळेंकडे पाठवले होते. मात्र, त्याचवेळी माजी मंत्री, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे मैदानात उतरले. त्यांनी बोराळकरच हवे, असा हट्ट धरला. लोकसभेच्या वेळी दानवेंच्या विरोधात लावलेला सूर बागडेंनी पदवीधरच्या उमेदवारीत आणखीनच आक्रमक केला. परिणामी बोराळकर हे बागडेंचे उमेदवार असाच संदेश गेला. आधीच बागडेंच्या विरोधात वावरणारे दानवे, श्रीकांत जोशी समर्थकही बोराळकरांपासून दूर होत गेले.
अति सूचना नडल्या! : मुंडेंचे निधन, बड्या नेत्यांमधील संघर्ष, गटबाजीला उधाण एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत बोराळकरांनी प्रचाराची ओपनिंग चांगली केली होती. मोदी लाटेवर स्वार होण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला. पंकजा मुंडेंची मदत घेण्यासाठीही हालचाली केल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येताच बोराळकरांची देहबोली बदलली. अखेरच्या चार दिवसात अमुक एका ठिकाणीच प्रचार करा. अन्य ठिकाणी जाऊ नका, असे औरंगाबाद, बीड, उस्मानबादेतील प्रमुख पदाधिकाºयांना ते सांगत होते. त्यामुळे नाराजी झपाट्याने पसरली. त्याचे रूपांतर मतदारांना घरातच ठेवण्यात आणि पर्यायाने बोराळकरांच्या पराभवात झाले.

मते बाद होणे अविश्वसनीय
पदवीधरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मते बाद होणे अविश्वसनीय आहे. गटबाजीचा आणि पराभवाचा काहीही संबंध नाही.
हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष, भाजप.
संपर्क कमी पडला
बोराळकर आणि कार्यकर्ते मतदारापर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडलो. हक्काचे मतदान करून घेतलेच नाही.
प्रवीण घुगे, मराठवाडा संघटक प्रमुख.