आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathwada Graduate Constituency Satish Chavan Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाडा पदवीधरचा गड चव्हाणांनी राखला, भाजपच्या बोराळकरांवर 15 हजारांनी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी सलग दुसर्‍यांदा बाजी मारली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा 15 हजार 118 मतांनी दणदणीत पराभव केला. पदवीधरमध्ये पहिल्यांदाच आवश्यक असणार्‍या कोट्यापेक्षा चार हजार दोनशे मतांनी चव्हाणांनी बाजी मारली.

महिनाभरापूर्वी देशभरात उसळलेली मोदी लाट मराठवाड्यात नसल्याचेही स्पष्ट झाले. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचाही परिणाम भाजपच्या प्रचार मोहिमेवर झाला. सुशिक्षितांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणार्‍या निवडणुकीत 12 हजार 961 मते अवैध ठरली आहेत. गेल्या सहा वर्षात पक्षभेद न बाळगता केलेल्या सर्वपक्षीयांच्या कामामुळेच हा विजय मिळाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला मंगळवारी सकाळी आठ वाजता कलाग्रामसमोरील मंडपात सुरुवात झाली.

पोस्टलमध्ये चव्हाण यांना 49 तर बोराळकरांना 43 मते पडली. हाच ट्रेंड पुढे कायम राहिला.
दुपारी बारा वाजेपर्यत 56 हजार मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये अवैध, नोटा (नकाराधिकार) तसेच उमेदवारांना पडलेल्या मतपत्रिका वेगळ्या करण्यात आल्या. चार वाजता पहिल्या फेरीचा, सात वाजेच्या सुमारास दुसर्‍या, साडेनऊ वाजता तिसर्‍या व अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला. चव्हाण यांना पहिल्या फेरीत 25 हजार 774, दुसर्‍यात 28 हजार 255 तर तिसर्‍यात 14 हजार 687 मते मिळाली. बोराळकर यांना पहिल्या फेरीत 22 हजार 542 दुसर्‍यात 20 हजार 342 आणि तिसर्‍यात 10 हजार 720 मते मिळाली. पहिल्या फेरीच्या निकालात पराभवाची चिन्हे दिसल्याने बोराळकर मतदान केंद्राबाहेर पडले. मतमोजणीच्या वेळेस प्रत्येक वेळी अवैध मत कोणते यावरुन अनेकदा वाद झाला. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यापर्यंत मतपत्रिका गेल्याने बराच वेळ वाया गेला.

केलेल्या कामाचा विजय
हा विजय म्हणजे मतदारसंघात सर्वपक्षीयांसाठी केलेल्या कामाची पावती आहे. मराठवाड्यात कुठेही मोदींची लाट नाही, हेही स्पष्ट झाले आहे. - सतीश चव्हाण

मुंडेसाहेब असते तर ...
मुंडेसाहेब असते तर भाजपचा 25 हजार मतांनी विजय झाला असता. कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी प्रचंड मेहनत घेतली. पण मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ कमी मिळाला.
- शिरीष बोराळकर