आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathwada Graduate Constituency,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमी मतदानामुळे दोन्ही पक्षांच्या तंबूत अस्वस्थता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभेत मतदानाचा टक्का वाढल्याने सर्वांचे लक्ष लागलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी सर्वांचीच अटकळ होती. जास्त मतदान झाले तर मलाच फायदा, असा दावा भाजपचे शिरीष बोराळकर आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी केला होता. गतवेळी 50 टक्के मतदान झाल्यानेच चव्हाण विजयी झाल्याचे समीकरण मांडले जात होते. यंदा मोदी लाटेमुळे बोराळकर जास्त मतदानाची अपेक्षा ठेवून होते, तर गतवेळीप्रमाणे या वेळी मतदान झाले तर आमदारकी कायम, असा राष्ट्रवादीचा होरा होता. मात्र प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी 40 टक्क्यांपर्यंतही पोहोचली नाही.
10 टक्के मते का घटली असावी, याचे मंथन होत असले तरी पदवीधर मतदारांच्या या भूमिकेमुळे राष्टÑवादी आणि भाजप या दोन्ही तंबूत अस्वस्थता आहे. सायंकाळी चार वाजता मतदान संपल्यानंतर लगेच बोराळकर आणि चव्हाण यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका बोलावल्या. कोठे किती मतदान झाले, कोणी किती मतदान करून घेतले अन् आपल्याला त्यातील किती मते मिळतील, याचे तर्क लावले जात होते. प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.
शक्यता क्रमांक 1
पदवीधर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. येथील मतदानाची सरासरी नेहमीच 40 ते 45 टक्क्यांच्या आसपास राहिली आहे. गतवेळी शिवसेनेने बंडखोरी केली होती. त्यात पहिल्या पसंतीची 14 हजार मते गेली. शिवाय राष्ट्रवादीने जोर लावून जास्तीचे मतदान करवून घेतले होते. त्यामुळे मतांची टक्केवारी 50 पर्यंत पोहोचली आणि दुस-या पसंतीच्या मोजणीत राष्ट्रवादीचे चव्हाण विजयी झाले. या वेळी सेनेचा उमेदवार नाही तसेच अन्य तिसरा किंवा त्या तोडीचा तगडा उमेदवार नाही. त्यामुळे भाजपच्या परंपरागत मतांत या वेळी फाटाफूट नाही.
शक्यता क्रमांक 2
लोकसभेत मोदी लाटेमुळे बाहेर पडलेले मतदान हे भाजपचे होते. मात्र पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले नाहीत. त्याचा फायदा राष्टÑवादीला होऊ शकतो. शिवाय परंपरागत समजले जाणारेच मतदान कमी झाल्याची चर्चा आहे. त्याचा सरळ फटका भाजपला बसू शकतो.
दुसरी पसंती महत्त्वाची
कमी पण एकतर्फी मतदान झाले असेल तरच पहिल्या पसंतीच्या मोजणीत विजय शक्य आहे, अन्यथा अन्य 21 उमेदवारांना पडलेल्या दुस-या पसंतीच्या मतांचे महत्त्व वाढणार आहे. पहिल्या पसंतीत दोघांतील फरक कमी असला तर दुस-या पसंतीच्या मोजणीत आघाडी घेतलेला उमेदवार पहिला क्रमांक गाठत विजय काठू शकतो. त्यामुळे मतमोजणी रंगत स्थितीत असण्याची शक्यता आहे.
मतदान करवून घेणे महत्त्वाचे
सरासरीच्या आसपास किंवा कमी मतदान झाले तर ते विद्यमान आमदाराच्या पथ्यावर पडते, असे समीकरण असते. मात्र पसंतीक्रम असलेल्या पदवीधर निवडणुकीचे समीकरण वेगळे असते. कोणी किती मतदार नोंदणी केली, किती जणांना मतदानासाठी बाहेर काढले, हे येथे महत्त्वाचे ठरते. यावरच येथील यशापयश अवलंबून असते. त्यामुळे मतदान कमी-अधिक किती झाले, यापेक्षा झालेले मतदान कोणी करवून घेतले यावर विजय ठरतो.
प्रवीण बर्दापूरकर, राजकीय विश्लेषक