औरंगाबाद - विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर संघात अवघ्या 38 टक्के पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. गतवर्षी हे प्रमाण 50 टक्के होते. सर्वाधिक मतदानाची नोंद हिंगोली जिल्ह्यात 45 टक्के झाली, तर परभणीत अवघे 32 टक्के पदवीधर मतदानासाठी घराबाहेर पडले. मंगळवारी (24 जून) मतमोजणी होणार असून रात्री उशिरा किंवा 25 जूनला पदवीधरचा आमदार कोण, हे स्पष्ट होणार आहे. रिंगणात विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यासह 23 उमेदवार आहेत.
सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत अवघे साडेपाच टक्के मतांची नोंद झाली होती. सर्व प्रक्रिया शांततेत सुरू होती. काही केंद्रांवर 8 ते 10 जणांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. शिक्षक मंडळी गटागटाने मतदान केंद्रांवर आली. याशिवाय काहींनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागातील केंद्रांवर मात्र शुकशुकाट होता. यात 38 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्हा एकूण मतदान टक्केवारी
औरंगाबाद 1 लाख 11 हजार 895 38
जालना 24 हजार 848 39
बीड 61 हजार 686 39.29
परभणी 31 हजार 628 32
हिंगोली 11 हजार 484 45
उस्मानाबाद 40 हजार 507 40
लातूर 52 हजार 229 34
नांदेड 44 हजार 832 34.99
एकूण 3 लाख 79 हजार 109 38.09
औरंगाबादच्या आकड्यांना विलंब : दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी देण्यात येत होती. मात्र, औरंगाबाद जिल्ह्याची आकडेवारी येण्यास विलंब होत होता. काही मतदान केंद्रांवर मोबाइलची रेंज नसल्यामुळे हा विलंब झाल्याचे सांगण्यात आले.