आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काच्या पाण्यासाठी आमदारांची ३ जुलै रोजी औरंगाबादेत बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडी असो अथवा कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळण्याबाबत विषय, मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आहे. हक्काचे पाणी मिळत नसल्यामुळे मराठवाड्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी ३ जुलैला औरंगाबादमध्ये लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. पाण्यावर आयोजित दिव्य मराठीच्या टॉक शोमध्ये ते बोलत होते. दरम्यान, आगामी बैठकीत लोकप्रतिनिधी आणि जलतज्ज्ञ मराठवाड्याची भूमिका मांडणार आहेत.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुर्लक्षीत राहिला आहे. गेल्या वर्षी बंब यांनी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. मात्र, मराठवाड्यातील अनेक आमदारांनी या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे या वर्षी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण देखील करण्यात येणार आहे. बंब म्हणाले, ३ जुलैला होणाऱ्या या बैठकीत मराठवाड्यातले जलतज्ज्ञ तसेच लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठीचे निमंत्रण सर्वांना पाठवण्याचे काम सुरू झाले आहे.

या बैठकीत जायकवाडीत समन्यायी प्रमाणे पाणी यावे यासाठी कोणते धोरण आखायचे यावर चर्चा करण्यात येणार आहे. वरच्या धरणातून पाणी सोडताना १५ ऑक्टोबरनंतर पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी जास्त झिरपून अपेक्षित पाणी जायकवाडीत येत नाही. जुलैमध्येच पाणीसाठ्यानुसार पाणी सोडण्यात यावे यासाठी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या बाबतीतही अपेक्षित पाणी मिळत नाही. त्यामुळे उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांला त्याचा मोठा फटका बसत आहे. या प्रश्नावरही चर्चा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यासमोर मांडणार भूमिका
३ जुलैला ही बैठक झाल्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्री तसेच जलसंपदा विभागासोबत मराठवाड्याच्या आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. दरवर्षी होणारा मराठवाड्याचा पाणीप्रश्न त्यातून होणारे वाद आणि मराठवाड्याचे होणारे नुकसान याबाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे. मराठवाड्याला समन्यायी पाणी वाटप हवे आहे, कसे द्यायचे ते तुम्ही ठरवा हे सांगण्यात येणार आहे. जुलैअखेर पाणी सोडणे सुरू झाले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास राज्यपालाकंडे ही मराठवाड्यातले आमदार एकत्रित येऊन भेट घेऊ, असे बंब यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...