आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi, Congress

बंडखोरांनी युती, आघाडीला फोडला घाम!,मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघांतील उमेदवार बेजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना बंडखोरांनी घाम फोडला आहे. काही स्थानिक नेत्यांच्या विरोधी भूमिकेमुळे त्यांना अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. त्यामुळे या बंडखोरांची मनधरणी करण्यात उमेदवारांचा बराच वेळ वाया जात आहे. या बंडाळीच्या निवडणूक निकालावरही परिणाम दिसून येणार आहे.


बंडखोराचा फटका सर्वाधिक आघाडीला
परभणीत जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बंडखोरीचा विषय मराठवाड्यात सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्याविरोधात त्यांनी उघड बंड पुकारले आहे. बोर्डीकर यांच्याविरोधात जिंतूर विधानसभा मतदारसंघात भांबळे यांनी निवडणूक लढवून बोर्डीकर यांच्या नाकी दम आणला होता. त्याची परतफेड ते लोकसभेच्या निवडणुकीत करणार असल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दुसरे नेते सुरेश वरपुडकरदेखील प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत. शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांनी आपण खासदार झाल्यानंतर विधानसभेची उमेदवारी तुम्हालाच देणार असे सांगत पक्षातील इच्छुकांना थोपवले आहे. मात्र, त्यांची भिस्त आघाडीच्या नाराजीवरच जास्त आहे.


हिंगोलीत दोन्ही पक्षाला नाराजींचा फटका
हिंगोली जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बंडाळीचा सामना करावा लागत आहे. शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना माजी मंत्री शिवसेनेचे नेते जयप्रकाश मुंदडा यांचा उघड विरोध आहे. जिल्हा परिषदेत मुंदडा गटाच्या उमेदवाराला अध्यक्ष न केल्यामुळे त्यांची नाराजी कायम आहे. त्यामुळे मनोमिलन झाले असले तरी मुंदडा प्रचारात सक्रिय सहभाग घेत नसल्यामुळे वानखेडे त्रस्त आहेत. हिंगोलीत काँग्रेसला जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांची उमेदवारी हुकली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून तयारी करणार्‍या पाटीलही फारशा सक्रिय नाहीत. मध्येच त्या बंडाची भाषा करतात. त्यामुळे सातव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सातव खासदार झाल्यास पाटील यांच्या नेतृत्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वरकरणी पाटील प्रचारात उतरल्या असल्या तरी त्या सक्रिय नाहीत.


लातूर, उस्मानाबादमध्ये युतीत मतभेद
लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र शेवटपर्यत मुंडे गट आणि गडकरी गटात उमेदवारी मिळवण्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे मराठवाड्यात सर्वात शेवटी लातूरमध्ये भाजपचे सुनील गायकवाड यांची उमेदवारी घोषित झाली. भाजपत बेबनाव असून कल्पना गिरी प्रकरणाचे भांडवल, नरेंद्र मोदींची सभा, विलासरावांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी यावरच निलंगेकर गट भाजपच्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. उस्मानाबादमध्ये सुरुवातीला उमेदवारी मिळवण्यासाठी ओमराजे निंबाळकरांनी प्रयत्न केले. मात्र, गेल्या वेळी पराभूत झालेले रवींद्र गायकवाड यांनाच उमेदवारी मिळाली. भाजपच्या रोहन देशमुख यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या आहेत.


औरंगाबाद-जालन्यात बंड थंड
जालना मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी शांत राहून बंड केले होते. तिकीट नाकारलेल्या बागडेंना भाजपने प्रदेश उपाध्यक्षपद देऊन शांत केले असले तरी ते किती मनापासून प्रचारात सहभागी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, तर काँग्रेसचे नामदेव गाडेकर आणि राष्ट्रवादीच्या सिल्लोड तालुकाध्यक्षांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. औरंगाबादमध्ये उत्तमसिंह पवारांचे बंड थोपवण्यात काँग्रेसला यश आले तरी माजी जिल्हाध्यक्ष अँड. सदाशिव गायकेंनी बंड केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. तर युतीतील बेबनाव अजूनही कायम आहे.


बीडमध्ये फोडाफोडीचे राजकारण
गोपीनाथ मुंडे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांनी चंग बांधला आहे. शरद पवारांनी आतापर्यंत बीडमध्ये दोन मुक्काम करत सभांचा धडाका लावला आहे. अजित पवारांपासून मंत्रिमंडळातील नेत्यांच्या सभा बीडमध्ये होत आहेत. मुंडेना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शर्थीचे प्रयत्न करत आहे. मुंडेनीदेखील तीन माजी आमदारांना भाजपत आणले आहे. बीडमध्ये सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मराठा मतांसाठी विनायक मेटेंना महायुतीत घेऊन मुंडेनी मराठा मतांची सोय केली आहे.