आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे पदवीधर उमेदवारीबाबत आस्ते कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार ठरवण्यात भाजपचे सध्या आस्ते कदम सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी 15 दिवसांत उमेदवार ठरवण्याचे घोषित केल्यानंतर भाजपमध्ये कोणतीच चर्चा सुरू नाही. त्यामुळे उमेदवार ठरणार की नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. उमेदवार घोषित न केल्यामुळे मतदार नोंदणीतही भाजप मागे पडल्याचे चित्र आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याचा मुहूर्त भाजपला अजूनही मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात गोपीनाथ मुंडेंनी पंधरा मिनिटांत मराठवाड्यातल्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन उमेदवार घोषित करू, अशी घोषणा केली. मात्र, अजूनही निर्णय न झाल्याने पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे.

उमेदवार कोणत्या जातीचा द्यायचा, तो औरंगाबाद जिल्ह्यातला की बाहेरच्या जिल्ह्यातला असावा, याबाबत भाजपमध्ये खलबते सुरू आहेत. त्यातच भाजपच्या काही मंडळींनी राष्ट्रवादीच्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यामुळे एक गट नाराज झाला आहे.

हक्काचे मतदार असतानाही भाजपच्या उमेदवारीबाबत फक्त चर्चेची गुर्‍हाळे सुरू आहेत. या मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, विजया रहाटकर, प्रवीण घुगे, संजय निंबाळकर, सतीश पत्की यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, मराठवाडा स्तरावर मतदार नोंदणी करताना तसे कोणतेही प्रयत्न भाजपकडून झाले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.