आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Regions Giving Water Beneficence Sense

मराठवाड्याला ओंजळभर पाणी देतानाही मेहेरबानीची भावना!- अशोक चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्याला हक्काचे पाणी देणे तर सोडाच, जे काही ओंजळभर देण्यात येते, त्यामागेही मेहेरबानी केल्याची भावना दिसते, याची खंत वाटते. असेच पुढे सुरू राहिल्यास राज्यात प्रादेशिक वाद वाढेल, अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी पैठण येथे झाले. या कार्यक्रमासाठी चव्हाण शहरात आले होते. साई शंकर येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
चव्हाण म्हणाले, स्व. चव्हाण यांना जायकवाडी धरण उभारतानाही नगर आणि नाशिकच्या नेत्यांशी पंगा घ्यावा लागला होता. जायकवाडीच्या धरणावर धरण होऊ नये यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. त्यांना या नेत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले; पण त्यांची भूमिका वैयक्तिक नव्हती. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, हाच त्यांचा हेतू होता. मात्र, अलीकडे वैयक्तिक पातळीवर वाद सुरू झाले आहेत. असेच पुढे सुरू राहिल्यास राज्यात प्रादेशिक वाद फोफावेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्याला हक्काचे पाणी देताना काही नेत्यांमध्ये उपकाराची भावना दिसते, हा प्रकार घातक असल्याचेही ते म्हणाले.

भाजप नेत्यांचे सल्लागार सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ला निषेधार्ह असल्याचे सांगतानाच आपल्या देशात अशा घटना घडाव्यात तसेच साहित्यिकांना पुरस्कार परत करण्याची वेळ यावी, यासारखे दुर्दैव दुसरे नसून कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे हे प्रतीक असल्याचे चव्हाण म्हणाले. सनातन संघटनेबाबत सरकारची मवाळ भूमिका बरेच काही सांगून जाते, असेही त्यांनी सांगितले.
युतीतील संघर्षाचा प्रशासनावर परिणाम : सध्याराज्यात सत्तेत असलेल्या युतीत मनोमिलन किंवा अन्य काहीही नाही. त्यांच्यात प्रखर संघर्ष आहे. याचा परिणाम प्रशासनावर दिसतो. प्रशासनावर पकड निर्माण करण्यात युती सरकारला अपयश आले, अशी टीका त्यांनी केली.

पाठिंबा देण्याची त्यांचीच इच्छा?
सत्तेवरयेताच भाजपच्या सरकारला पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादीने जाहीर केले होते. मात्र, यापुढे पाठिंबा दिला जाणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले. या प्रश्नावर छेडले असता, विद्यमान सरकार कायम राहावे, अशी काँग्रेस वगळता अन्य पक्षांची भावना आहे. त्यामुळेच त्यांचा खटाटोप सुरू असावा, असे सांगतानाच चव्हाण यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नाही.

मानसोपचाराची बुद्धी कोणी दिली?
शेतकऱ्यांच्याआत्महत्यांवर सरकारचे कोणीही बोलत नाही. उलट शेतकरी मनोरुग्ण असल्याचे गृहीत धरून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहेत. असा जी.आर. काढण्याची बुद्धी शासनकर्त्यांना कोणी दिली, असा सवाल त्यांनी केला. यंदा महागाई वाढली असून शेतकरी तर सोडाच, कोणीही सामान्य नागरिक ही दिवाळी साजरी करू शकणार नाही, असे ते म्हणाले.