आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या तरुणाने दिली देशाला ‘ऊर्जा’, 150 पेट्रोल पंप सौरऊर्जेवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नित्याच्याच भारनियमनाच्या संकटावर मात करण्यासाठी लातूरच्या तरुणाने केलेला सौर पेट्रोल पंपाचा अभिनव प्रयोग देशभरातील पेट्रोल पंप व्यावसायिकांसाठी संजीवक ठरला आहे. त्याचे हे तंत्रज्ञान उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश व तामिळनाडूसह देशभर स्वीकारले गेले. त्याच्या कल्पनेतून साकारलेल्या या तंत्रज्ञानावर इंडियन ऑइल कंपनीचे देशातील 150 पेट्रोल पंप सौरऊर्जेवर चालू लागले आहेत.


शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. साब्दे यांनी परिस्थितीवर मात करीत संशोधनासाठी अमेरिका गाठली. सोलार सिटी विषयात पीएचडी मिळवल्यानंतर 2007 मध्ये नामांकित ‘थ्री एम’ कंपनीत सोलार अँड कॅम्पनंटचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. दरम्यान, ते अनेकदा भारतात आले. 2008 मध्ये लातूर येथील डॉ. श्रीरंग जटाळ यांच्या रुग्णालयाच्या ऑपरेशन सुरू असताना अचानक लाइट गेली आणि रुग्णावरील उपचार थांबले. भारतात परतायचे आणि पारंपरिक ऊर्जेचा वापर करून सौर यंत्र तयार करण्याचा त्याच वेळी त्यांनी निश्चय केला.


सहा महिने सर्व्हे, चर्चासत्र : भारतात परतल्यावर डॉ. साब्दे यांनी कमी खर्चात सौर पॅनल कसे तयार करता येईल याचा अभ्यास करून डिझाइन तयार केले. प्रकल्पास यश येत असल्याचे दिसताच त्यांनी चर्चासत्रे भरवली. याच दरम्यान दिल्लीच्या प्रगती मैदानात भरलेल्या प्रदर्शनात कमी खर्चात उच्च दर्जाचे सोलार पॅनल बसवण्याचे मॉडेल भारतीयांसमोर सादर केले.


इंडियन ऑइलचा पुढाकार : मॉडेल पाहिल्यानंतर इंडियन ऑइल कंपनीने डॉ. साब्दे यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. यापूर्वी कंपनीने भारनियमन काळात पेट्रोल पंप सुरू ठेवण्यासाठी परदेशी कंपनीच्या मदतीने नोएडा येथे बारा लाख रुपये खर्च करून दहा किलोवॅटची सौर यंत्रणा बसवली होती. मात्र, डॉ. साब्दे यांनी पंप चालवण्यासाठी केवळ 3 किलोवॅट पुरेसे असल्याचे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले.


राज्यातील पहिला पंप औरंगाबादेत : इंडियन ऑइल कंपनीने राज्यातील पहिली सौर यंत्रणा सिल्लोडमध्ये अन्वीकर पेट्रोल पंपावर बसवली. भारनियमनाचा सर्वाधिक त्रास असल्याने कंपनीने राज्यात 85 पंपांवर ही यंत्रणा बसवली. नंतर मराठवाड्यातील अकरा शहरांचा ती बसवण्यात आली. उत्तर प्रदेश- 26, हरियाणा- 8, ओडिशा- 24, आंध्र प्रदेश- 7, तामिळनाडू-6 अशी सोलार यंत्रणा कार्यान्वित आहे.


पर्यावरणास फायदा : पेट्रोल पंपावर जनरेटर बसवले तर 17 रुपये प्रतियुनिट दराने खर्च येतो, तर सौरयंत्रणेच्या माध्यमातून 8 रुपये प्रतियुनिट खर्च येतो. जनरेटरमध्ये डिझेल वापरले जाते आणि ते सुरू होण्यासाठी दहा मिनिटे लागतात. याशिवाय जनरेटमधील डिझेलमुळे वर्षाला 8 टन कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. तो पर्यावरणास हानिकारक आहे. याउलट सौरयंत्रणेवर अवघ्या 30 सेकंदांत सुरू होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीवर ही यंत्रणा बसवण्यात आली असून वर्षाकाठी वीज बिलाचे दोन कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे.


वर्षाला 2 लाखांची बचत
पंपासाठी तासाला दीड लिटर याप्रमाणे आठ तासांसाठी दहा ते अकरा लिटर डिझेल लागते. दररोज 500 ते 600 रुपये खर्च म्हणजेच वर्षाला दोन लाख रुपये खर्च करावा लागतो. याउलट सौरऊर्जा यंत्रणा बसवल्यास केंद्र शासनाकडून पहिल्या दोन वर्षांत दोन लाख रुपयांची सबसिडी मिळून अवघ्या दोन वर्षांत यंत्रणेचा खर्च वसूल होतो.


इंडियन ऑइलचा पुढाकार
कंपनीने दहा ते बारा लाख रुपये खर्च करून आंतरराष्‍ट्रीय कंपनीकडून नोएडा येथे 10 किलोवॅटचा प्रकल्प उभा केला होता. मात्र, डॉ. साब्दे यांनी हाच पंप तीन किलोवॅटच्या प्रयोगातून यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवल्याने कंपनी देशभरातील पंपांवर हा उपक्रम राबवत आहे.
सुबोधकुमार, महाव्यवस्थापक, इंडियन ऑइल, दिल्ली