आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौताळ्यात फुलणार मराठवाड्यातील पहिले फुलपाखरू उद्यान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशविदेशातील फुलपाखरांच्या लाखो प्रजातींचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी गौताळा अभयारण्यात आठ एकरांवर मराठवाड्यातील पहिले फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात येणार आहे. गुजरातेतील सिल्व्हासा येथे देशातील सर्वोत्कृष्ट उद्यान असून त्याचीच ही प्रतिकृती असेल. यासाठी शासनाने ६ काेटी रुपयांचा निधीही वन्यजीव विभागास मंजूर केला आहे. येत्या मे महिन्यात काम सुरू होऊन तीन वर्षांत हे उद्यान उभे राहणार आहे.
गौताळा अभयारण्य परिसर २१८ चौरस मीटरचा आहे. अभयारण्याच्या रेंजमध्ये चाळीसगाव, नागदचा भाग येतो. त्यामुळे २२ हेक्टर परिसर होतो. लगत पितळखोरे, अजिंठा, वेरूळ व औट्रम घाट असल्याने या भागाची सर्वत्र ओळख आहे. त्यामुळे लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना फुलपाखरू उद्यानाचे आकर्षण राहील. अभयारण्यात सर्व प्राण्यांच्या ५० ते ६० प्रजाती आहेत. त्यात बिबटा, नीलगाय, काळवीट, रानडुक्कर, तडस, कोल्हे, लांडगे आहेत. पक्ष्यांमध्ये गरुड, मोर आणि दुर्मिळ पक्षीही आहेत.
दुष्काळग्रस्त भाग असूनही वन विभागाने चांगली व्यवस्था केल्याने वन्य प्राणी जंगल सोडून वस्त्यांमध्ये येत नाहीत. डोंगराळ भाग असूनही पाणथळीच्या जागा करण्यात अाल्या आहेत. पावसाळ्यात त्या भरल्या की वर्षभर प्राण्यांना पुरेल एवढा पाणीसाठा होतो. याचाच विचार करून शासनाने फुलपाखरू उद्यानास परवानगी दिली आहे. सिल्व्हासा येथील उद्यानाची पाहणी करण्यासाठी वन्यजीव विभागाचे पथक लवकच गुजरातला जाणार असल्याचे सहायक वन्यजीव अधिकारी एस.बी. तांबे यांनी सांगितले.
पर्यटनाला चालना, रोजगाराची निर्मिती
अभयारण्यामुळे लगतच्या गावांचा विकास खुंटत होता. संपूर्ण परिक्षेत्र संरक्षित असल्याने कोणताही उद्योग किंवा वन्यजीवांना बाधा पोहोचेल असे काम करता येत नव्हते. हे पाहून राज्य शासनानेच हा प्रकल्प उभारण्याचे सुचवले. लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक येथे येतील व स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असा यामागे हेतू आहे. मे २०१६ मध्ये उद्यानाचे काम सुरू होईल आणि २०१९पर्यंत संपेल.
असे असेल गौताळा बटरफ्लाय गार्डन
> अभयारण्यालगत हिवरखेड येथे गट क्र. १५३ मध्ये ९०० हेक्टर जागा आहे. यातील ८ एकरांवर उद्यान होईल. पालकमंत्री रामदास कदम यांनी ६ कोटी मंजूर केले आहेत.
> फुलपाखरांसाठी आवश्यक दलदल, फुलझाडे व दऱ्याखोऱ्यांचे रस्ते केले जातील. सिल्व्हासाहून शेकडो प्रजाती आणल्या जातील. नंतर देशविदेशातील प्रजाती येतील.
> उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्रामीण भोजन देण्याचाही बेत आहे. यामुळे २८ हेक्टर परिसरातील गावकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
गावकऱ्यांची मंजुरी
बटरफ्लाय उद्यानासाठी गावकऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे गावचा विकास होईल, शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले जातील. ग्राम परिस्थितीय विकास समितीनेही अभारण्याच्या विकासासाठी मदत करण्याचे ठरवले आहे.
भारत लवांदे, अध्यक्ष, ग्राम परिस्थितीय विकास समिती
बातम्या आणखी आहेत...