आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिशेब ‘चुकता’ करण्यासाठी बँकांमध्ये सर्वांचीच लगबग, मार्च एंडिंगमुळे 3 दिवस धावपळीचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादेतील सगळ्या बँकांमध्ये मार्च एंडिंगची लगबग सुरू झाली असून कर्जवसुलीपासून ठेवींच्या टार्गेटपूर्तीपर्यंत कामे करण्यासाठी बँक कर्मचार्‍यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. दरम्यान, करभरणा वगैरे कामांसाठी उद्या बहुतेक बँका सुरू राहणार आहेत. दुसरीकडे चेक क्लिअरिंग केंद्रात बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांत साडे पाचशे कोटी रुपयांचे चेक क्लिअर करण्यात आले.

2012- 13 चे आर्थिक वर्ष संपायला आता अवघे तीन दिवस उरले असून वर्षभरातील उलाढालींचा आढावा घेत टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि हिशेबाचे आकडे जुळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे चित्र बहुतेक बँकांत पाहायला मिळत आहे. करभरणा करण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याने त्यासाठी स्टेटमेंट्स, ठेवी, गुंतवणूक या कामांसाठी बँकांमध्ये ग्राहकांचीही गर्दी दिसून येत आहे.

सुट्यांवर संक्रांत : मार्च एंडिंगमुळे बँक कर्मचार्‍यांच्या सुट्यांचा बळी गेला आहे. शुक्रवारी गुडफ्रायडे असूनही बँक कर्मचार्‍यांना आकडेमोड करीत बसावे लागणार आहे. शासकीय व्यवहार असणार्‍या बँकांच्या शाखा ग्राहकांसाठी सुरू राहणार आहेत. त्यात करभरणा, चालान करणे वगैरे शासकीय कामे या बँकांत सुरू राहतील. इतर व्यवहार मात्र ग्राहकांना करता येणार नाहीत.

शनिवारी हाफ डे असतो; पण यंदा 30 तारखेला शनिवार येत असल्याने हाफ डेचा फुल डे करण्यात आला असून दिवसभर बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे.

31 मार्चला रविवार असला तरी अकाउंट क्लोजिंगचे काम असल्याने त्या दिवशीही बँका सुरू राहणार आहेत. त्या दिवशीही करभरणा आणि इतर शासकीय कामे होणार आहेत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक शिवचरण फोकमारे यांनी सांगितले.

टार्गेटसाठी धावाधाव
सरत्या आर्थिक वर्षातील उलाढालीचे अहवाल आल्यानंतर वर्ष संपण्याआधी टार्गेट पूर्ण करण्याचे काम सर्वच बँकांत वेगात सुरू आहे. थकीत कर्जवसुलीचा धडाका सुरू झाला आहे. त्याशिवाय ठेवींचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. ठेवी, करंट अकाउंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उद्दिष्टपूर्ती करण्यावर भर दिला जात आहे. औरंगाबादेत एकूण 60 बँका आहेत. त्यांच्या शाखांची संख्या अडीचशेच्या आसपास आहे. खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांची औरंगाबादेतील वर्षाकाठची उलाढाल 40 हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे.

261 कोटींचे क्लिअरिंग
मार्च एंडिंग म्हणजे बँका आणि ग्राहक यांच्यासाठी हिशेब खर्‍या अर्थाने चुकता करण्याचा काळ असल्याने मोठय़ा प्रमाणावर चेकच्या माध्यमातून रकमा दिल्या जातात. औरंगाबादेत चेक क्लिअरिंगसाठी पंजाब नॅशनल बँकेचे केंद्र असून तेथे मागील आठवडाभरापासून कामाचा ताण वाढला आहे. या क्लिअरिंग शाखेचे मुख्य व्यवस्थापक एस. के. दास यांनी सांगितले की, या केंद्रात एरवी 15 ते 18 हजार चेक क्लिअरिंगला येतात. गेल्या दोन दिवसांत ही संख्या 20 ते 25 हजारांपर्यंत पोहचली आहे. बुधवारी या केंद्रांत 261 कोटी रुपयांच्या चेकचे क्लिअरिंग झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 300 कोटी रुपयांचे क्लिअरिंग होण्याची शक्यता आहे. 29, 30 आणि 31 मार्च रोजी क्लिअरिंग सुरु राहाणार आहे.