आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दहा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बाजार; विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- व्यापारी आणि दलालांची साखळी मोडीत काढून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पणन विभागामार्फत आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. रविवारी दर्गा रोड येथील कृषी कार्यालय परिसरात प्रायोगिक तत्त्वावर आठवडी बाजार भरवण्यात आला. ग्राहकांना ताजा आणि वाजवी भावात भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी औरंगाबाद शहरात १० ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या बाजाराच्या उद््घाटनप्रसंगी दिली. 

डॉ. भापकर म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालातून त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत. दलाल मध्यस्थांमुळे ग्राहकांचा आनंद हिरावला जातो. अशा बाजारात मात्र ताजा माल किफायतशीर भाव मिळत असल्याने ग्राहकांचा आनंद द्विगुणित होतो आणि पैसाही शेतकऱ्यांपर्यंत सरळ जातो, असे सांगून डॉ. भापकर यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे दर्जेदार मार्केटिंग झाले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. 

सेंद्रिय शेतीची गरज...
रासायनिकखते कीटकनाशकांचा भाजीपाला अन्नधान्यांवर परिणाम होऊन मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय खते कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य आहे. यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय खत निर्मिती करावी, असे आवाहन डॉ. भापकर यांनी केले. 

जि.प. मैदानात भरणार बाजार...
जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी अशा बाजारासाठी औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषदेचे मैदान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले, तर कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. महेश साळुंके पाटील यांनी दलाल मध्यस्थांचे उच्चाटन व्हावे आणि शेतकरी ग्राहकांत थेट व्यवहार व्हावा यादृष्टीने असे बाजार भरवण्यासाठी जागा मिळवत असल्याचे सांगितले. 

या वेळी वसंत देशमुख यांचेही भाषण झाले. नगरसेविका सुमित्रा हाळनोर यांच्या क्षेत्रात या आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

उशिरा का होईना मुहूर्त सापडला...
सरकारनेऑगस्ट महिन्यात श्री संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. लगेच याची शहरात अंमलबजावणी होणे अपेक्षित होते; पण कृषी पणन विभागाचा गलथान कारभार, मनपाने जागा देण्यास केलेला उशीर यामुळे तब्बल नऊ महिन्यांचा विलंब झाला. उशिरा का होत नाही, मुहूर्त सापडल्याने रविवारी बाजार भरला. 
बातम्या आणखी आहेत...