आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या स्पर्धेमुळे ब्रँडिंगचे ऑडिट करण्याची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्याच्या वाढत्या स्पर्धेत वस्तूची ब्रँडिंग करणे काळाची गरज बनली आहे. मात्र याच स्पर्धेमुळे उत्पादन वाढल्यानंतरही ब्रँडचेदेखील ऑडिट होणे गरजेचे बनले आहे, असे मत वेलवर्थ क्रिएटिव्ह मीडियाचे प्रमुख अपूर्व हौजवाला यांनी व्यक्त केले आहे. सीएमआयएच्या वतीने शनिवारी मार्केटिंगवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
बदलत्या काळात मार्केटिंगचे तंत्रज्ञानही बदलत आहे. त्यामुळे २०१६ मध्ये मार्केटिंग कसे बदलेल या विषयावर सीएमआयएच्या कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डिजिटल स्ट्रॅटेजी एलो मस्टर्ड पुणेचे संचालक नरेश गर्ग यांनी डिजिटल तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. या वेळी सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ यांची उपस्थिती होती.

स्पर्धेमुळे लोकांतील संभ्रमात वाढ
हौजवाला यांनी सांगितले की, सध्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाढत्या स्पर्धेमुळे लोकांमध्ये संभ्रमही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मार्केटिंगमध्ये एक आव्हान निर्माण झाले आहे. एकाच प्रकारच्या अनेक उत्पादनांच्या सातत्याने करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. ब्रँडच्या माध्यमातून लोकांच्या मनात ती इमेज बनवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्या उत्पादनाची चर्चा झाली की लोकांच्या डोक्यात त्याच उत्पादनाचे नाव पहिल्यांदा आले पाहिजे. मात्र ब्रँड करताना सुरुवातीला ज्या वस्तूंचे उत्पादन करायचे आहे त्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे. गुणवत्ता नसेल तर ब्रँडिग करूनही उत्पादन फार काळ टिकू शकणार नाही. या वेळी मोबाइलमधल्या काही कंपन्याची उदाहरणे सांगत त्या कंपन्या का बंद झाल्या याची माहिती हौजवाला यांनी दिली. तर काही कंपन्यांचे इतके ब्रँडिंग झाले की त्या मोबाइलची किंमत कितीही जास्त असली तरी लोक खरेदी करतात. हेच ब्रँडिंगचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रँडिंग होत असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्येही त्या उत्पादनाबद्दल आपुलकी असणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली तरच त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो. ब्रँडिंगच्या ऑडिटमध्ये सध्या बाजारात त्या वस्तूची स्थिती काय आहे, त्यावर काय चर्चा आहे, लोकांच्या काय तक्रारी आहेत याविषयीची माहिती मिळते. त्यामुळे हे ब्रँडिंग ऑडिट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल मार्केटिंग चित्र बदलवणार
गर्ग यांनी सांगितले की आगामी काळात डिजिटल मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. लोकांची लाइफस्टाइल बदलत चालली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वेळदेखील नाही. त्यामुळे नवनवे बिझनेस मॉडेलदेखील बाजारात येत आहेत. व्हॉट्सअॅप असो अथवा ईमेल, इंटरनेट, फेसबुक, लिंकडेन अशा वेगवेगळ्या माध्यमातून मार्केटिंग केले जात आहे. सोशल मीडियाच्या शेकडो साइट्स आहेत या माध्यमातूनदेखील मार्केटिंग केली जात आहे. त्यामुळे भविष्यात डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून हे चित्र बदललेल असे मत गर्ग यांनी व्यक्त केले.