आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँडवादकाने परत केले सापडलेले 52 हजार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - लग्नात बँड वाजवण्याचे काम करणार्‍या 28 वर्षीय तरुणाने रस्त्यावर सापडलेले 52 हजार रुपये शेतकर्‍याला परत करून प्रामाणिकपणाची प्रचिती दिली आहे. रवी मच्छिंद्र कनगरे असे या तरुणाचे नाव आहे. नागमठाण येथील शेतकरी तुकाराम बढे (75) यांनी उपचारासाठी बँकेतून हे पैसे काढले होते.

महालगावच्या जिल्हा बँकेतून पैसे काढून बढे सोमवारी रिक्षाने वैजापूरला आले. गंगापूर रस्त्यावर त्यांच्या खिशातून हे पैसे खाली पडले. त्याच वेळी वैजापूरच्या हबीब ब्रॉस बँडचे पथक औरंगाबादला जात होते. एका कलावंताला घेण्यासाठी पथकाचे वाहन थांबले होते. रवीला रस्त्यावर ही रक्कम पडलेली दिसली. त्याने ती उचलून बँड पथकाचे प्रमुख जमील अहमदखाँ यांच्याकडे दिली. दरम्यान, बढे यांना शहरात खरेदी केल्यानंतर पैसे हरवल्याचे लक्षात आले. रिक्षातून जेथे उतरले होते तेथे त्यांनी शोध घेतला. परंतु पैसे न सापडल्याने ते हताश झाले. तेवढय़ात एका रिक्षाचालकाने बँड पथकातील एकास पैसे सापडल्याचे सांगितले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान तांबे यांनी जमीलखाँ यांच्याशी संपर्क साधला. रवीने मंगळवारी बढे यांना ही रक्कम परत केली. मोंढा भागात राहणारा रवी लग्नसराईत बँडवादन, तर इतर काळात भंगाराचा व्यवसाय करतो. या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.