आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या परवानगीने ‘गरवारे’वर लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गरवारे स्टेडियमची हेळसांड रोखण्यासाठी मनपा प्रशासनास अपयश आल्यास वॉर्ड अधिकार्‍यास जबाबदार धरले जाणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी स्पष्ट केले. 17 जानेवारीपर्यंत क्रीडांगणाचा वापर खेळाशिवाय इतर कोणत्याही उपक्रमासाठी करू नये, असा आदेश न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी नुकताच दिला. खंडपीठात नव्याने दाखल दोन दिवाणी अर्जांच्या सुनावणीत अर्टी-शर्तीवर लग्न व इतर समारंभासाठी क्रीडांगण वापरण्याची परवानगी देण्यात आली.

गरवारे स्टेडियमचा गैरवापर थांबवण्यासाठी शहरातील छायाचित्रकार बसवराज जिबकाटे, निशांत जैस्वाल, शेख समीर शेख पाशा व संजय महामुनी यांनी अँड. महेश भारस्वाडकरमार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. 23 डिसेंबरला खंडपीठाने 17 जानेवारीपर्यंत गरवारे स्टेडियम खेळाशिवाय इतर कुठल्याच कार्यक्रमांना दिले जाऊ नये, असे आदेश दिले होते. व्यावसायिक प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभांमुळे स्टेडियमचे नुकसान होत असून क्रिकेटसाठीच क्रीडांगणाचा वापर व्हावा असे याचिकेत म्हटले होते.

दोघांनी केले दिवाणी अर्ज
खंडपीठाने 23 डिसेंबरला दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने देवीसिंह बैनाडे व मसिआने दिवाणी अर्ज दाखल केले. बैनाडे यांच्या मुलीचे लग्न 24 डिसेंबरला गरवारे स्टेडियमवर होते, तर मसिआतर्फे 4 ते 9 जानेवारी 2014 दरम्यान महाएक्स्पो होणार आहे. खंडपीठाने दोन्ही कार्यक्रमांना अटी-शर्तीवर मैदान वापरण्याची परवानगी दिली. समारंभानंतर मैदान पूर्ववत करून दिले नाही तर मनपाच्या वॉर्ड अधिकार्‍यास जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. क्रिकेटचे मैदान व खेळपट्टी नादुरुस्त होता कामा नये, असे खंडपीठाने म्हटले. वॉर्ड अधिकार्‍याने लेखी स्वरूपात खंडपीठात म्हणणे सादर केले. मनपातर्फे अँड. अतुल कराड यांनी बाजू मांडली. दिवाणी अर्जदारातर्फे अँड. राजेंद्र देशमुख व अँड. प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.