आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेला विकणार्‍या दांपत्यासह दोघे अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पुंडलिकनगरमधील विवाहितेचे अपहरण करून तिला विकणार्‍या तसेच दुसरे लग्न करण्यासाठी भाग पाडणार्‍या राजस्थानी बाप-लेकासह माळीवाडा येथील दलाल दांपत्याला गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पकडले. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
केदारखेडा (जि.जालना) येथील 25 वर्षीय महिलेचा पतीशी कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. ही महिला चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीत कामाला असून तिची दोन्ही मुले केदारखेडा येथे आईजवळ राहतात, तर ती पुंडलिकनगरात एकटीच राहते. तेथील दोन युवतींशी आशाची (नाव बदलले आहे) ओळख असून त्यांनी तिची माळीवाडा येथील अनिता भगवान गिरे हिच्याशी ओळख करून दिली. दहा दिवसांपूर्वी आशा व तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन अनिता सुरतला गेली. तेथे आशाला राजस्थान येथील एका मुलासोबत लग्न करण्यास सांगितले.
नकार देत आशाने ट्रॅव्हल्सने औरंगाबाद गाठले. त्यानंतर बुधवारी दुपारी अनिताने पुन्हा आशाशी संपर्क साधत तिला शरणापूर फाट्याजवळील आम्रपाली हॉटेलसमोरील उद्यानात आणले. तेथे अनिताचा पती भगवान गिरे, सोमराज जैन व त्याचा मुलगा जयराज जैन (रा. रायपूर, राजस्थान) उभे होते. अनिताने परत लग्नाचा आग्रह धरला. आशाने नकार देताच शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांच्या तावडीतून सुटका करून आशाने तत्काळ पोलिस आयुक्त संजयकुमार यांची भेट घेतली. त्यांनी गुन्हे शाखा पोलिसांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी चौघांना शरणापूर येथून अटक केली.
20 हजारांत ठरला सौदा
राजस्थानातील सोमराज जैन यांच्या मुलाशी लग्न लावून देण्यासाठी गिरे दांपत्याला 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आतापर्यंत किती मुलींची गिरे दांपत्याने विक्री केली आहे हे चौकशीअंती उघडकीस येईल.