आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेच्या मृत्यूनंतर तणाव, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- सात महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधलेल्या नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून लिंबेजळगाव येथे राहत्या घरी स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा तिची प्राणज्योत मालवली. अंत्यविधीकरिता वाळूज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी वाळूज पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कावेरी हरी कनसे (२२) हिचा विवाह लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे स्थायिक झालेल्या सलूनचालक हरी कनसे याच्यासोबत सात महिन्यांपूर्वी झाला. दरम्यान, कावेरीला सासरकडील मंडळींचा त्रास असल्यामुळे तिने शुक्रवारी (२ जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेतले. त्यात ती गंभीररीत्या भाजली. दरम्यान, तिने आपल्याला सासरकडील मंडळींचा त्रास असल्याचा जबाब पोलिसांना दिल्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले. कावेरीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ती जास्त भाजल्यामुळे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ितची प्राणज्योत मालवली.
कावेरीच्या दुर्दैवी मृत्यूची घटना कळताच तिच्या माहेरकडील परिचित नातलगांनी थेट वाळूज पोलिस स्टेशनला धाव घेऊन संबंधितांना तत्काळ ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. कावेरीच्या मृत्यूची वार्ता कळताच तिची सासू दीर फरार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. कावेरीवर लिंबेजळगाव येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली.
अंत्यसंस्कारादरम्यान अनुचित प्रकार घडणार असल्याची माहिती असल्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, पती हरीच्या हस्ते कावेरीच्या चितेला अग्नी देताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, संतप्त नातेवाइकांपासून हरीला वाचवण्यासाठी चारही बाजूने कडे तयार करून हरीला वाळूज पोलिस ठाण्यात नेण्यात आले.