आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरपत्नीने उभारले शहीद पतीचे स्मारक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जम्मू आणि काश्मीरच्या सुरणकोट जिल्ह्यात "ऑपरेशन रक्षक'मध्ये शहीद झालेले विष्णू चव्हाण (रा. जरंडी, ता. सोयगाव) यांचे स्मारक त्यांची वीरपत्नी मुक्ता यांनी उभारले आहे. तीन वर्षांपासून पेन्शनची रक्कम जमा करून ग्रामस्थांच्या मदतीने हे स्मारक उभारले असून सोमवारी (२६) गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर त्याचे लोकार्पण होत आहे.
१९९५ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या विष्णू यांची प्रशिक्षणानंतर १० मेकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली. तीन वर्षांसाठी राष्ट्रीय रायफल्समध्ये ते होते. त्यांना जम्मू -काश्मीरच्या सुरणकोट जिल्ह्यातील पुंछ सेक्टरच्या तारणावली येथे तैनाती मिळाली. तेथे "ऑपरेशन रक्षक' या अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्याच्या मोहिमेत त्यांना १५ सप्टेंबर २००८ रोजी वीरमरण आले. पतीच्या निधनानंतर खचून जाता धैर्याने उभे राहत वीरपत्नी मुक्ता यांनी शहीद जवानाचे स्मारक उभारण्यासाठी कंबर कसली. मागील तीन वर्षांत पेन्शनमधून प्रतिमहिना हजार ते दाेन हजाार रुपयांची बचत केली. एखाद्या महिन्यात दहा ते पंधरा हजार रुपये स्मारकासाठी काढून ठेवले. अशा प्रकारे सत्तर हजार रुपये जमवले. ग्रामस्थांनी देखील दहा हजार रुपयांची मदत दिली. यातून जरंडी गावाच्या चौकात पाच फूट रुंद आठ फूट उंच शहीद स्मारक उभारले. यामुळे समस्त ग्रामस्थांतही आनंद व्यक्त होत आहे.
स्मारकासाठीबंदूक दिली : शहरातीलमोंढा नाका येथील बंदूकवाला या दुकानदाराने आठ हजारांची बंदूक केवळ पाच हजारांत दिली. बंदुकीवर ठेवण्यासाठी सातशे रुपयांचे शिरस्त्राण भेट म्हणून दिले.

ग्रामस्थांचे साहाय्य महत्त्वाचे
स्मारकासाठी ग्रामस्थांनी केलेले साहाय्य महत्त्वाचे आहे. गावातील जवानाचा आदर्श घेऊन इतर तरुणांनीही सैन्यात जावे, अशी अपेक्षा आहे. सात वर्षांनंतर स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद आहे. भविष्यात गावाच्या प्रवेशद्वारावर कमान उभारण्याचे कामही केले जाईल. मुक्ताचव्हाण, वीरपत्नी.