आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मसालेदार सफरी’ चे औरंगाबादकर साक्षीदार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गिरीश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या मसाला चित्रपटाचे चित्रीकरण आज सिटीचौक आणि बीबी का मकबरा परिसरात झाले, याचा औरंगाबादकरांनी जसा अनुभव घेतला त्याचप्रमाणे आम्हालाही हा आनंददायी अनुभव होता, असे प्रमुख भूमिकेत असलेल्या गिरीष कुलकर्णी यांनी सांगितले.
मसाला या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी युनिट शहरात आले होते, त्या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवीण मसाल्याचे जनक हुकमीचंद चोरडिया तसेच त्यांच्या पत्नी कमलाबाई यांच्या आयुष्यावर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
संदेश कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेल्या मसाला या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सुरू आहे. सध्या नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी शूटिंग झाले आहे. आयुष्याच्या उदरनिर्वाहासाठी विविध शहरांत फिरून तसेच स्वत:चा विकास साधता साधता, इतरांनाही चोरडिया यांनी कशा पद्धतीने व्यवसाय उभा केला. यामध्ये त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी कशी साथ दिली याचा प्रवास चित्रपटात उलगडून दाखवला आहे.
गिरीष कुलकर्णी यांनी सांगितले, मराठी चित्रपट प्रमोशनमध्ये कमी पडतात, त्यामुळे मसालाचे चित्रीकरण सुरू असतानाच प्रमोशन करण्याचा आमचा विचार आहे. याशिवाय चित्रपटाच्या कहाणीची ही मागणी आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटामध्ये माझी भूमिका आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. धीटपणाने नव-याच्या पाठीशी उभी राहणारी सारिका मी यामध्ये साकारली आहे. आजवर गिरीष यांच्यासोबतीने मी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्या सर्वच माझ्या आवडत्या भूमिका आहेत, असे अमृता सुभाष हिने सांगितले.
चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर म्हणून एच.एम. रामचंद्र काम पहात आहेत, ही चित्रपटाची जमेची बाजू असल्याचे दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा मानस असल्याचेही कु लकर्णी यांनी सांगितले. विविध ठिकाणी चित्रीकरण करतानाचा उद्देश स्पष्ट करताना संदेश कुलकर्णी म्हणाले, अनेकदा चित्रीकरण फक्त मुंबई-पुण्यातच होत असल्याने उर्वरित महाराष्ट्रात चित्रपट पोहोचत नाहीत म्हणून आम्ही चित्रीकरण सर्वत्र करून प्रेक्षकांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रीकरणाचा अनुभव मस्त - औरंगाबादेत आम्ही सिटीचौकात फुल विकण्याचा तर अत्तरगल्लीमध्ये अत्तर विकणा-या जोडप्याचे दृश्य चित्रित केला. येथील लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष शहरात चित्रीकरण झाल्याने हा चित्रपट पे्रक्षकांच्या अधिक जवळ जाणारा ठरेल यात काहीच शंका नाही. - गिरीश कुलकर्णी