आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात सरकारविरोधी आक्रमक झालेल्या शिवसेनेवर भाजपची कुरघोडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक निवडताना शक्यतो पक्षाचा विचार केला जात नाही. उमेदवाराचा संपर्क आणि त्याची उपयोगिता याकडे मतदारांचा कल असतो. त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले यावरून त्या पक्षाला मिळालेला तो कौल आहे, असे म्हणणे चुकीचेच असते. फार तर त्या त्या पक्षाच्या उमेदवार निवडीचा तो जय- पराजय म्हणता येईल; पण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे त्या दृष्टीने पाहणे योग्य होणार नाही. ही निवडणूक काहीशी विधानसभेसारखी झाली आहे. त्यात मतदार काही प्रमाणात पक्षाचा विचार करतो. त्या दृष्टीने मराठवाड्यात भाजपला मतदारांनी बऱ्यापैकी कौल दिला आहे, असे म्हणता येईल. खरे तर शिवसेनेचेही भाजप इतकेच म्हणजे पाच नगराध्यक्ष निवडून आले आहेत. दोघांच्याही नगराध्यक्षांच्या संख्येत तीनने वाढ झाली आहे. पण शिवसेनेला त्यापेक्षाही अधिक यश मिळेल असे वाटत होते आणि भाजपाचे मोठे नुकसान होईल, असेही अंदाज केले जात होते. पण तसे झाले नाही, म्हणून हे निकाल भाजपच्याच फायद्याचे आहेत असे म्हणायला हवे.
मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळातच शिवसेनेने या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला होता, असे म्हणायला वाव आहे. सामूहिक विवाह सोहळे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत, सत्तेत असूनही सरकारच्या विरोधात आंदोलने, शिवसेना पक्षप्रमुखांचे दौरे, मंत्र्यांचे संपर्क अभियान असा धडाकेबाज कार्यक्रम शिवसेनेने मराठवाड्यात राबवला होता. तो राबवताना विरोधीपक्षात असल्यासारखी सरकार विरोधी, खरे तर भाजपविरोधी भाषणेही केली होती. त्यामुळे त्याचा फायदा शिवसेनेला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत होईल, अशी शक्यता वाटत होती. भाजपच्या बाबतीत एकदमच उलट परिस्थिती होती. दुष्काळाच्या वेळची नाराजी, शिवसेनेसह काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचा विरोधी प्रचार आणि त्यात आलेली नोटबंदी याचा नकारात्मक परिणाम भाजपाच्या यशावर होण्याची शक्यता होती; पण शिवसेनेइतकेच यश मिळवण्यात या पक्षाला विरोधकांना रोखता आले नाही. आता हे यश असेल तर त्याचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्षांना किती आणि मुख्यमंत्र्यांना किती हे त्यांनीच ठरवावे.
परळीेत पंकजा मुंडे यांना आणि भोकरदन नगरपालिकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला, याचीही मोठी चर्चा हाेत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. परळी नगरपालिका आधीपासूनच राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडे होती आणि भोकरदनमध्ये भाजपचा एकच नगरसेवक होता. त्यामुळे तिथे त्यांचा पराभव म्हणण्यापेक्षा या दोन्ही नगरपालिका राष्ट्रवादीकडून भाजपकडे खेचण्यात या दोन नेत्यांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या मंदा लोणीकर या भाजपचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि तरीही पराभव पत्करावा लागला. मंत्री झाल्यापासून बबनरावांचा परतूरमधला संपर्क खूपच कमी झाला होता. सत्ता येताच ते बदलले, असे लोकांना वाटले आणि म्हणून त्यांनी धडा शिकवला असावा. मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेऊनच भाजपने मंदा लोणीकर यांना अपक्ष उमेदवार केले होते; पण शेवटच्या क्षणी बबनरावांनी मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन भाजपचा शिक्का मारून घेतला. त्याचाही परिणाम झाला असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंकजांसाठी परळीला आणि बबनरावांसाठी परतूरला सभा घेऊनही तिथे अपयश आले, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
बीड नगरपालिकेत १२, धारूरला एक तर हिंगोली नगरपालिकेत एक अशा १४ जागांवर एमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. ओवेसीच्या एका सभेने हा परिणाम बीडमध्ये घडवला आहे. याचा अर्थ आेवेसी बंधूंचे गारूड अजून कमी झालेले नाही. काॅंग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. उस्मानादबाद जिल्ह्यातल्या मुरुम पालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना युती पाहायला मिळाली. मागच्या निवडणुकीत भूम पालिकेत शिवसेना काॅंग्रेसबराेबर गेली होती. या दोन्ही अनैसर्गिक युतीचा शिवसेनेला फारसा उपयोग झाल्याचे मात्र दिसले नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना खेचण्यात या वेळीही भाजपला यश आले आणि त्यामुळेही त्यांचे संख्याबळ वाढले, हेही दुर्लक्षून चालणार नाही.

दीपक पटवे, निवासी संपादक (औरंगाबाद)
बातम्या आणखी आहेत...