आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maulana Azad Education Foundation Fraud Cases Aurangabad

आझाद संस्थेच्या संचालकांविरुद्ध अफरातफरीच्या तक्रारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशनचे संचालक, विश्वस्त, प्राचार्य, उपप्राचार्य आणि विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह अभियंते अशा 19 जणांविरुद्ध निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सय्यद मुजफरोद्दीन खान अब्दुल कय्युम (64, रा. जसवंतपुरा) यांनी भ्रष्टाचार आणि अफरातफर केल्याच्या वेगवेगळय़ा स्वरुपाच्या तीन तक्रारी सिटीचौक पोलिसांकडे केल्या आहेत. मात्र, या तक्रारी बिनबुडाच्या आणि तथ्यहीन असल्याचे मौलाना आझाद संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. मकदुम फारुकी यांनी स्पष्ट केले आहे.

खान यांनी दिलेल्या पहिल्या तक्रारीत म्हटले आहे की, रोझाबागेतील मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा अध्यापक महाविद्यालयाच्या डॉ. रफीक झकेरिया कॅम्पसमध्ये संचालकांनी जाणीवपूर्वक प्राध्यापकांच्या अवैधरित्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना दरमहा 5 लाख रुपये वेतन शासनाच्या तिजोरीतून दिले जात आहे.

याची माहिती उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. मोहंम्मद फैय्याज यांना असतानाही निधीचा गैरव्यवहार करत आहेत. प्राध्यापकांच्या नियुक्त्या अवैध असल्याचे राज्यपाल नियुक्त डॉ. गणेश शेटकर चौकशी समितीने म्हटले होते. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली नाही.

दुसर्‍या तक्रारीत म्हटले की, विश्वविद्यालय अनुदान आयोग, गणेशखिंड, पुणे (यूजीसी) यांनी 26 फेब्रुवारी 2006 रोजी महाविद्यालयाच्या कॅन्टीन बांधकामासाठी सात लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली. 6 डिसेंबर 2007 रोजी तत्कालीन प्राचार्य डॉ. दोस्त महंमद खान, अभियंता व वास्तुशिल्पकार मोहंमद नजीरोद्दीन, चार्टर्ड अकाऊंटंट केळकर, परांजपे तसेच बोर्ड ऑफ कॉलेज अँण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे अध्यक्ष डॉ. ए. जी. खान यांच्या सहय़ा असलेल्या पत्रात बांधकाम पूर्ण झाल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात ते पूर्ण झालेले नाही.

तिसर्‍या तक्रारीत त्यांनी म्हटले की, 19 जून 2006 रोजी संस्थाध्यक्षा फातेमा झकेरिया यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात यूजीसीच्या दिशा निर्देशानुसार संस्थेच्या सिटी सव्र्हे क्र. 11492 आणि 11493 मधील 270 चौरस मीटर जागेवर मुलींसाठी वसतीगृह बांधण्याचे ठरले. मात्र, एन-12, रोझाबाग सव्र्हे क्र. 12 येथील 17,401.80 चौरस मीटर जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला. यूजीसीकडून 50 लाख 95 हजार 502 रुपये मंजूर करण्यात आले. मात्र बांधकाम, खर्चाबाबतची कोणतीही माहिती संस्थेने पाठवली नाही. म्हणून युजीसीने मंजूर रक्कम दहा टक्के व्याजासह परत करावी, असे पत्र पाठवलेले आहे.