आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौलवींनी समाजकारणात यावे; मोहंमद वली रहमानी यांचे भाष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मौलवींनी धर्माच्या चौकटीतून बाहेर येऊन समाजकारणात आपले योगदान द्यावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकशाही व्यवस्थेत मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केला जावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहाव असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना मोहंमद वली रहमानी यांनी केले.

सोमवारी (30 डिसेंबर) नेहरू भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण, राजकारण, ज्वलंत सामाजिक विषयांवर रहमानी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मुस्लिम समाजाने धार्मिक शिक्षणासोबतच कायद्याचा अभ्यास करणे आज गरजेचे झाले आहे. कायदा आणि लोकशाहीची सांगड घालून तुम्हाला तुमचे हक्क मिळवता येतील. यासाठी सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. समाजातील मौलवी, उच्चशिक्षितांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. चांगले काम करणे आणि ते सतत करत राहणे ही मौलवींची परिभाषा आहे. भारतात लोकशाही आहे, ही सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे. मानवतेचा आदर करून कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. मुस्लिमांचे प्रश्न सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करीत ते म्हणाले, मुस्लिमांच्या प्रश्नांना कायद्याच्या पेचामध्ये अडक वले जाते. यामुळे मुस्लिम समाजाच्या हिताचे मुद्दे अनेक वर्षांपासून अडगळीत पडले आहेत. मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा द्यावा. यासाठी कायदेविषयक ज्ञान व उच्च शिक्षणाची गरज आहे. व्यापक वैचारिक दृष्टिकोन आणि आत्मचिंतन करून सातत्याने काम केल्यास निश्चितच सक्षम समाज उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


डॉ. अब्दुल गफ्फार कादरींनी मौलानांचा अल्पपरिचय करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात अब्दुल हमीद अझहरी यांनी केली. उबैद उर रहमान यांनी कुराण पठण केले. या वेळी मौलाना महेफुजूर रहमान, मौलाना रियाजोद्दीन फारुकी, मुफ्ती मो. जाकेर, नगरसेवक शाहनवाज खान, उवैज अहमद, मुज्तबा फारुकी, मौलाना नईम कासमी, हाफिज शोएब रहमानी, हाफिज अ. मतीन, सय्यद रफत, अ. रहमान आदींची उपस्थिती होती.

मुजफ्फरनगरातील दंगली वेदनादायी
मुजफ्फरनगर येथे झालेले दंगे अत्यंत वेदनादायी होते. यात शेकडो निरपराधांना प्राण गमवावे लागले. हजारो कुटुंबे घरदार सोडून निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत. क्षुल्लक गोष्टीवरून दोन समाजात वाद होत आहेत. या गोष्टीचा सर्वांनीच विचार केला पाहिजे. ढोंगी राजकारणी स्वार्थासाठी दंगल भडकावण्याचे काम करतात. सरकार अशा लोकांच्या मुसक्या आवळण्यात असमर्थ ठरली आहे, असेही रहमानी म्हणाले.