आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर-उपमहापौरांचे काउंटडाऊन सुरू, ३१ ऑक्टोबरला द्यावा लागेल राजीनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीतील करारानुसार महापौरपद पुढील एक वर्षासाठी भारतीय जनता पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरला दीड वर्ष पूर्ण होणार असल्याने विद्यमान महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांना राजीनामा द्यावा लागेल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर सेना भाजपमध्ये पद वाटपात पहिल्या अडीच वर्षांपैकी दीड वर्ष महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे राहील, असे ठरले होते. नंतरचे एक वर्ष महापौरपद भाजपकडे जाताना उपमहापौरपद आपोआपच शिवसेनेकडे जाईल. त्यानंतरची अडीच वर्षे हे पद शिवसेनेकडेच राहणार आहे. या करारानुसार येत्या ३१ ऑक्टोबरला महापौर तुपे उपमहापौर राठोड यांना राजीनामा द्यावा लागेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नव्या पदांसाठी निवडणूक होईल.
दोघांच्या कार्यकाळाचे काउंटडाऊन सुरू असताना त्यांचे वारसदार कोण, याची चर्चा भाजप आणि शिवसेनेत सुरू झाली आहे. महापौरपदासाठी भगवान घडामोडे आणि राजू शिंदे या दोन माजी उपमहापौरांमध्ये स्पर्धा आहे. साडेसात वर्षांनंतर महापौरपद भाजपकडे जाईल. या काळात शहरात अनेक विकासकामे होणार असल्याने या पदावर ज्येष्ठ अनुभवी नगरसेवक असावा, असे सर्वांनाच अपेक्षित आहे. केवळ मराठा म्हणून महापौर द्यायचा असेल तर राजगौरव वानखेडे, विजय औताडे, शिवाजी दांडगे रामेश्वर भादवे यांची नावे पुढे येताहेत. अर्थात, वानखेडे वगळता अन्य तिघेही पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. नवा महापौर कोण असेल याचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील.
बातम्या आणखी आहेत...